ऑनलाईन मैत्री भोवली, 60 वर्षांच्या महिलेला आयफोनच्या नावाने 4 कोटींचा गंडा

cyber-crime
प्रातिनिधीक फोटो

सोशल मीडियावर मैत्री जपून करावी, असा सल्ला वारंवार दिला जातो. पण, लोकं काही ना काही आमिषाने अशा मैत्रीत फसतात आणि नुकसान करून घेतात. अशीच एक घटना पुण्यातील एका महिलेसोबत घडली आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, ही 60 वर्षीय महिला पुण्यात राहते. एका खासगी कंपनीत ती वरिष्ठ पदावर काम करते. काही महिन्यांपूर्वी या महिलेच्या बँक खात्यातून 27 निरनिराळ्या अकाउंट्समध्ये 207 व्यवहार करण्यात आले. त्या संपूर्ण व्यवहारांमध्ये तब्बल 3.98 कोटी रुपये काढण्यात आले.

पुणे सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2020च्या एप्रिल महिन्यात या महिलेची सोशल मीडियावर एका अनोळखी माणसाशी ओळख झाली. या व्यक्तिने आपण ब्रिटनमध्ये राहत असल्याचा दावा केला. त्यानंतर त्याने तिला वाढदिवसाच्या भेटीच्या रुपात आयफोन पाठवला असल्याचं सांगितलं.

सप्टेंबर महिन्यात या माणसाने कस्टम क्लिअरन्सच्या नावाखाली पैसे उकळले आणि तिला एका पाकिटात दागिने आणि परदेशी चलन पाठवल्याचं सांगितलं. त्यानंतर तिच्या खात्याचा वापर करून 3 कोटी 98 लाख 75 हजार 500 रुपये काढले गेले.

महिलेला या फसवणुकीची जाणीव झाल्यानंतर तिने पुणे सायबर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत तपासाला सुरुवात केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या