मालवण बंदरात ४०० पैकी पाचच जलपर्यटन होड्या अधिकृत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमित खोत । मालवण

मालवण बंदरात ४०० जलपर्यटन प्रवासी होड्या असून फक्त पाचच होड्या शासन दप्तरी अधिकृत परवानाधारक आहेत. अन्य पर्यटन होड्यांपैकी काही परवानगीच्या प्रक्रियेत आहेत. तर काहींकडे कोणतीही परवानगी नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

दरम्यान मालवणचे जल पर्यटन यापुढे शिस्त व परवानगीच्या चौकटीत आणले जाणार आहे. जल पर्यटन व्यवसायात शिस्त आणण्यासाठी जे जे शक्य आहे, ते ते केले जाणार आहे. यात माझी बदलीही करण्याचा प्रयत्न झाल्यास मी सदैव तयार असणार आहे. अशा शब्दात सिंधुदुर्गचे नुतन प्रादेशिक बंदर अधिकारी कप्टन सुरज नाईक यांनी आपली भूमीका स्पष्ट केली.

मालवण बंदर कार्यक्षेत्रातील जलक्रीडा प्रकल्प, नौकानयन व सर्व प्रकारच्या जलप्रवासी वाहतूकदारांची बैठक बुधवारी शहरातील नगरवाचनालय सभागृहात बोलविण्यात आली होती. अनधिकृत जलव्यवसाय अधिकृत करण्याबाबत आवश्यक कागदपत्रे व अन्य माहिती याबाबत प्रादेशिक बंदर अधिकारी कप्टन सुरज नाईक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बंदर निरीक्षक सुषमा कुमठेकर, बंदर निरीक्षक एस. आर. वेंगुर्लेकर, आर. जे. पाटील, सहाय्यक बंदर निरीक्षक ए. आर. गोसावी, टी. जी. मसके, सर्व्हेअर सुधाकर श्रीवास्तव, एस. यु. कदम, ए. एस. गांवकर, एस. एन. नार्वेकर, डी. एस. चोडणेकर, एस. एम. बोवलेकर, एस. आर. मिठबावकर, नाईक आदी उपस्थित होते. याप्रसंगी व्यवसायीकांच्यावतीने मेघनाद धुरी, संजय

केळुसकर, रूपेश प्रभू, देवानंद चिंदरकर, सहदेव बापर्डेकर, दामोदर तोडणकर, बाबली चोपडेकर, स्वप्नील आचरेकर, गजानन कुबल, मंगेश सावंत, महेश कोयंडे, इजाज मुल्ला, रोहित मेथर, संजय नार्वेकर, राजू पराडकर, दशरथ केळुसकर तसेच इतरांनी आपल्या समस्या मांडल्या.

जलप्रवासी वाहूतक व जलक्रीडा २६ मे ते ३१ आगस्ट या पावसाळी कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश आहेत. बंदी कालावधीत प्रवासी जलवाहतूक आढळून आल्यास दंडात्मक अथवा फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. किनारपट्टीवर जलप्रवासी व जलक्रीडा प्रकल्प मालवण तालुक्यातून कर्ली खाडीपात्रात देवबाग व तारकर्ली तसेच कोळंब खाडीपात्रात जलक्रीडा सुरू असल्याच्या तक्रारी बंदर विभागाकडे प्राप्त आहेत. त्यानुसार संबंधित व्यावसायिकांना जलक्रीडा व्यवसाय बंद करून होड्या किनार्‍यावर काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर बंदी कालावधीत प्रवासी वाहतूक व जलक्रीडा व्यवसाय सुरू ठेवल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई वसूल करण्यात आली आहे. याहीपुढे पावसाळ्यात कोणतीही जलप्रवासी वाहतूक सुरू असल्याचे दिसून आल्यास कारवाई होणार आहे, असेही कॅप्टन नाईक यांनी स्पष्ट केले.

बेकायदेशीर जलपर्यटन व्यवसायावर कारवाईच
प्रामाणिक व्यवसाय करायचा आहे, त्यांना बंदर विभागाकडून आवश्यक ते सहकार्य मिळणार आहे. आणि ज्यांना अनधिकृत व्यवसाय यापुढेही चालू ठेवायचा असेल त्यांना नवा पर्यटन हंगाम १ सप्टेंबर पासून कारवाई काय असेल ती समजून येईल. पर्यटकांचा जीव धोक्यात घालून कोणीही बेकायदेशीरपणे जलपर्यटन व्यवसाय करत असेल तर त्याच्यावर कारवाई ही होणारच. बेकायदेशीर व्यवसाय करणार्‍या सर्वांच्या गॉडफादरांना भेटूनच मी याठिकाणी कार्यरत झालो आहे. असा सूचक इशारा कॅप्टन नाईक यांनी अनधिकृत व्यावसायिकांना दिला.

आवश्यक ते सर्व सहकार्य आम्ही करणार
पर्यटन व्यावसायिकांना शासनाच्या परवानगी घेण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य आम्ही करणार आहोत. मात्र बेकायदेशीरपणे चालणार्‍या प्रत्येक होडीवर कारवाई केली जाणार आहे. अडीच महिने अगोदर बैठक घेऊन सर्वांना सूचना करण्यात आलेली आहे. सूचना करूनही कोणी असहकार्य करेल तर त्याच्यावर काययदेशीर बडगा उगारला जाईल. पैसे भरल्यानंतर सर्व्हेअर आणण्यासाठीही प्रयत्न केले जातील. तसेच इन्शुरन्स कंपनीकडून मिळत असलेल्या असहकार्याबद्दल शासनाचे लक्ष वेधण्यात येईल, असेही नाईक यांनी स्पष्ट केले.