टीईटीत मुंबई विभागातील केवळ एक टक्का उमेदवार पात्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने नोव्हेंबर 2021 मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये (टीईटी) मुंबई विभागातील केवळ एक टक्का उमेदवार तर राज्यातील 3.69 टक्के उमेदवार पात्र ठरले आहेत. काही महिन्यांपूर्वी टीईटी परीक्षेतील घोटाळा उघडकीस आल्यानंतर या परीक्षेच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले होते. यंदा परीक्षा परिषदेने निकालात पारदर्शकता ठेवल्याचे दिसून येत असून वर्ष 2019 मधील टीईटी परीक्षेच्या तुलनेत यंदा राज्याचा निकाल तीन टक्क्यांनी घसरला आहे. 2019 मध्ये टीईटीचा राज्याचा निकाल सहा टक्के लागला होता.

राज्यभरातील 4 लाख 2 हजार 18 विद्यार्थ्यांनी टीईटी दिली होती. त्यांपैकी केवळ 17 हजार 287 उमेदवार टीईटीत पात्र ठरले आहेत, तर 2 हजार 433 उमेदवारांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. या परीक्षेत राज्यातील केवळ तीन ट्रान्सजेंडर उमेदवारच पात्र ठरले आहेत. पेपर-1 मध्ये केवळ तर पेपर-2 (एसएस) मध्ये 2 ट्रान्सजेंडर उमेदवार टीईटी पात्र आहेत. राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील शिक्षक पदावर नियुक्तीसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

मुंबई विभागातील दीड हजार उमेदवार

मुंबई विभागातील 1 हजार 521 उमेदवार टीईटी परीक्षेत पात्र ठरले आहेत. यातील सर्वाधिक उमेदवार ठाणे जिह्यातील आहेत. ठाण्यातील 640 उमेदवार आहेत. त्याखालोखाल मुंबई 373, रायगड 304 आणि पालघरमधील 204 उमेदवार टीईटी पात्र ठरले आहेत.