
सामना प्रतिनिधी । मुंबई
दहावीचा अभ्यासक्रम यंदा बदलला असून या नव्या अभ्यासक्रमाची पहिलीच परीक्षा मार्च 2019 मध्ये होणार आहे. या परीक्षेपासून गणित आणि इंग्रजी द्वितीय आणि तृतीय भाषा विषयांसाठी केवळ एकच प्रश्नपत्रिका असणार आहे. आतापर्यंत प्रश्नपत्रिकांचे ए, बी, सी, डी हे प्रश्नसंच आता असणार नाहीत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याविषयीचे परिपत्रक जारी केले आहे. बहुसंच प्रश्नपत्रिकेची सुविधा ही केवळ जुन्या अभ्यासक्रमाची परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांना लागू असणार आहे. तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही बहुसंच प्रश्नपत्रिका असणार आहे.
– कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी 2004 सालापासूनच बहुसंच प्रश्नपत्रिका पद्धत अमलात आणली. पण दहावीचा बदललेला अभ्यासक्रम हा आता पाठांतरावर आधारित नसून तो कृतिशील आणि विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारा आहे. त्यामुळे परीक्षेत कॉपी होण्याचा प्रश्नच नसल्याने यंदापासून बहुसंची प्रश्नपत्रिका पद्धत रद्द करण्यात आली आहे.



























































