२८० केंद्रातील कचरा गोळा करण्यासाठी फक्त ४ वाहने !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विनोद पवार । पिंपरी

शहरातील रुग्णालयांमध्ये तयार होणारा जैववैद्यकीय कचरा २८० केंद्रांमध्ये जमा करण्यात येतो. मात्र, २८० केंद्रांमधून हा जैववैद्यकीय कचरा गोळा करण्यासाठी केवळ चार वाहनांचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. तसेच या जैववैद्यकीय कचऱ्यावर एका युनिटमध्येच प्रक्रिया आणि विल्हेवाट लावली जाते. त्यामुळे या कचऱ्यावर योग्य प्रक्रिया केली जाते की नाही, याबाबत सांशकता आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१७-१८च्या पर्यावरण सद्य:स्थिती अहवालातून ही बाब समोर आली आहे. रुग्णालयांमध्ये आरोग्य चिकित्सा किंवा उपचारांदरम्यान निदान, उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण या प्रक्रियांदरम्यान निर्माण होणाऱ्या निरुपयोगी आणि टाकाऊ वस्तूंना ‘जैववैद्यकीय कचरा’ म्हणून संबोधले जाते. जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियमानुसार जैववैद्यकीय टाकाऊ वस्तूंचे विभक्तीकरण, संकलन, वाहतूक, प्रक्रिया आणि विल्हेवाट करणे हे त्या त्या प्रकारच्या जैववैद्यकीय कचरानिर्मितीवर अवलंबून असते. हा कचरा पर्यावरणास हानीकारक असतो.

शहरात खासगी रुग्णालये, दवाखाने आहेतच. मात्र, सद्य:स्थितीत केवळ महापालिकेच्या ८४ हजार लोकसंख्येमागे एक दवाखाना असे ३२ दवाखाने आहेत. सध्याच्या २२ लाख लोकसंख्येकरिता चार रुग्णालयांची आवश्यकता असताना महापालिकेची आठ रुग्णालये आहेत. संत तुकारामनगर येथे महापालिकेचे ७५० खाटांचे यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय आहे. रुग्णालयात अस्थिरोग, नेत्ररोग, स्त्रीरोग, बालरोग, दंतरोग, कर्करोग असे विविध विभाग आहेत. या रुग्णालयात कार्डिओलॉजी, युरोलॉजी, नेप्रोलॉजी, न्युरोसर्जरी, न्युरोलॉजी, पेटियाट्रिक सर्जरी, हॅण्ड आणि प्लॅस्टिक सर्जरी, हृदय, मूत्रपिंडे, मज्जासंस्था अशा प्रकारच्या सुविधांचा समावेश आहे. दररोज शेकडो रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचार घेतात. गंभीर रुग्णांवर उपचार करण्याकरिता रुग्णालयात दोन अतिदक्षता विभाग आहेत. त्यामुळे जैववैद्यकीय कचरा निर्माण होण्याचे प्रमाणही वायसीएम रुग्णालयात प्रचंड आहे.

केवळ वायसीएम रुग्णालयात सन २०१६-१७ या वर्षात चार लाख २१ हजार ४२७ किलो जैववैद्यकीय कचरा निर्माण झाला; तर २०१७-१८मध्ये चार लाख ९६ हजार ८५७ किलो जैववैद्यकीय कचरा निर्माण झाला. या कचऱ्यावर जाळणे किंवा वाफेवरील निर्जंतुकीकरण यंत्राद्वारे प्रक्रिया केली जाते. शहरात जैववैद्यकीय कचरा गोळा करण्यासाठी एकूण २८० केंद्रे आहेत. या केंद्रांवरून जैववैद्यकीय कचरा गोळा करण्यासाठी केवळ चार वाहनांचा वापर केला जातो. या जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी केवळ एक युनिट आहे. या एका युनिटमार्फत वर्षभरात सुमारे पाच लाख किलो जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे या यंत्रणेवर अतिशय ताण येतो. याचा परिणाम जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियमानुसार या कचऱ्यावर योग्य प्रक्रिया केली जाते की नाही? हा प्रश्नच आहे.