सीआरपीएफ जवानांना विमानाने नेले असते तर पुलवामा घडले नसते, माजी लष्करप्रमुखांचे परखड मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरमध्ये तैनातीसाठी पोहोचण्यासाठी लष्कराच्या वाहनांऐवजी लष्करी विमानांच्या साहाय्याने सीआरपीएफच्या जवानांना तैनातीच्या ठिकाणी पोहोचवले असते तर पुलवामा जिल्ह्यात 2019 साली सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर करण्यात आलेला दहशतवादी हल्ला टाळता आला असता, असे परखड मत माजी लष्करप्रमुख शंकर रॉयचौधरी यांनी व्यक्त केले.

माजी लष्करप्रमुख शंकर रॉयचौधरी यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत आपले मत व्यक्त केले. 14 फेब्रुवारी 2019 साली झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. रॉयचौधरी म्हणाले, पुलावामा जिल्हा हा पाकिस्तानच्या सीमेला लागून आहे. अशा वेळी जवानांना विमानाने अत्यंत सुरक्षितपणे तैनातीच्या ठिकाणी नेण्याऐवजी अडीच हजार जवानांना 78 लष्करी वाहनांमधून महामार्गावरून घेऊन जाणे, हे धोकादायक होते. अशा वेळी जवानांवर दहशतवादी हल्ला होण्याचा धोका अनेक पटीने वाढलेला असतो. मात्र, मोदी सरकारने हा धोका पत्करला असे ते म्हणाले. पुलवामा हल्ला टाळता आला असता. या हल्ल्याबद्दल मी माझे मत पंतप्रधान मोदी यांच्याकडे व्यक्त केले होते. मात्र, त्यांनी मला गप्प बसायला सांगितले, असा गौप्यस्फोट जम्मू-कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला होता. त्यानंतर आता माजी लष्करप्रमुख रॉयचौधरी यांनी जवानांवरील हल्ला टाळता आला असता, असे मत व्यक्त करून मोदी सरकारच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली आहेत.

जबाबदारी पंतप्रधान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची

पुलवामा हल्ल्याला सर्वस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल जबाबदार आहेत. लष्कराच्या गुप्तचर विभागाचे हे मोठे अपयश आहे, असेही रॉयचौधरी म्हणाले.