
देशातील जनतेच्या प्रश्नांसाठी 26 हून अधिक पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेत ‘इंडिया आघाडी’ स्थापन केली आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर ‘इंडिया आघाडी’ची पुढली बैठक बुधवारी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक बोलवण्यात आली होती. मात्र आता ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याचं वृत्त इंडिया टुडेनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.
‘इंडिया आघाडी’तील सर्व पक्षांची उपलब्धता लक्षात घेऊन ही बैठक बोलवण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. अद्याप इंडिया आघाडीकडून अधिकृतरित्या कुणी याविषयी बोललेले नाही.
























































