
विरोधी पक्ष एकत्र आल्यास 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजप संपेल, असे आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ठाम शब्दांत सांगितले. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. या वेळी या दोन नेत्यांमध्ये विविध मुद्दय़ांवर चर्चा झाली.
भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे मजबूत आव्हान उभे करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर विरोधकांच्या ऐक्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात नितीशकुमार हे अनेक नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. शनिवारी कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा शपथविधी झाला. या सोहळ्याला भाजपविरोधी अनेक पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले. त्यात नितीशही होते. मात्र अरविंद केजरीवाल यांना काँग्रेसने निमंत्रित केले नाही. या पार्श्वभूमीवर आज तातडीने नितीश यांनी केजरीवाल यांची घेतलेली भेट लक्षवेधी ठरली. दोन्ही नेत्यांमधील एका महिन्यातील ही दुसरी भेट होती. राष्ट्रीय राजकारण तसेच दिल्लीतील बदल्या आणि नियुक्त्यांबाबत केंद्र सरकारने आणलेल्या अध्यादेशावर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
…तर राज्यसभेत सरकारचा पराभव
केंद्र सरकारचा हा अध्यादेश संविधानाच्या विरोधात असून निवडून आलेल्या सरकारला दिलेले अधिकार काढून कसे घेतले जाऊ शकतात, असा सवाल करत या मुद्दय़ावर आम्ही केजरीवाल यांच्या पाठीशी आहोत, असे नितीश म्हणाले. तर केंद्राने हा अध्यादेश विधेयकाच्या स्वरूपात आणला आणि भाजपेतर पक्ष एकत्र आले तर राज्यसभेत केंद्र सरकारचा पराभव होऊ शकतो, असा विश्वास या वेळी केजरीवाल यांनी व्यक्त केला. भाजपचा राज्यसभेत पराभव झाल्यास एक महत्त्वाचा संदेश देशात जाईल, असेही ते पुढे म्हणाले.
विरोधी ऐक्यावर एकमत
देशातील सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे या वेळी नितीश यांनी सांगितले. त्यावर केजरीवाल यांनीही जोरकसपणे भूमिका मांडली. विरोधक एकत्र आल्यास येत्या लोकसभा निवडणुकीत भाजप संपेल, असे ते म्हणाले.
केजरीवाल ममता, उद्धव ठाकरे, शरद पवार यांची भेट घेणार
अध्यादेशाच्या मुद्दय़ावर सर्व विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळवण्याचा अरविंद केजरीवाल यांचा प्रयत्न आहे. त्यात 23 मे रोजी ते कोलकाता येथे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांची भेट घेणार असून 24 मे रोजी केजरीवाल मुंबईत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर 25 मे रोजी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेणार आहेत. दिल्लीतील सरकारी अधिकाऱ्यांच्या बदली, बढतीबाबत केंद्राने काढलेल्या अध्यादेशाविरुद्ध पाठिंबा देण्याची विनंती या भेटीत केजरीवाल करणार आहेत.



























































