अफवा पसरविणे हेच विरोधकांचे काम – दादा भुसे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । शिर्डी

कोणत्याही अफवांना बळी पडू नका, विरोधकांकडे केवळ तेवढंच भांडवल आहे, ते तुमच्यात फूट पाडण्याचे काम करताहेत, असे आवाहन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी शिर्डीत शिवसेना- भाजपासह महाआघाडीच्या कार्यकर्त्यांना केले.

राज्यमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्याला संपर्क मंत्री आमदार नरेंद्र दराडे, खासदार सदाशिव लोखंडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन तांबे, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अनिता जगताप, भाजपाचे तालुकाध्यक्ष नंदकुमार जेजुरकर, कमलाकर कोते, शिर्डी शिवसेना शहर प्रमुख सचिन कोते, विजय जगताप, सुहास वहाडणे, सुनील परदेशी आदींची उपस्थिती होती. साईबाबांच्या किर्तीमुळे शिर्डीचे नाव मोठे आहे. त्यामुळे येथील खासदार आपलाच असावा, असे सांगत इंदीरा गांधींपासून दिला जाणारा गरीबी हटावचा नारा आजही देण्यात येत असल्याचे सांगत दादा भुसे यांनी काँग्रेसवर टिका केली.

अपक्ष लढणारे माजी खासदार वाकचौरे भाजपचा छुपा पाठिंबा असल्याचे सांगत असले तरी त्यात काही तथ्य नसल्याचे आमदार नरेंद्र दराडे यांनी स्पष्ट केले. खासदार लोखंडे यांनीही गेल्या पाच वर्षात केलेल्या प्रमुख कामांची माहीती देत २०१४ मध्ये दानाच्या रूपाने मतदान केलंत आता काम पाहून मतदान करा, असे आवाहनही केले. तर सचिन तांबे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला उमेदवारही मिळत नसल्याचे सांगत केंद्र व राज्य सरकारांबरोबरच खासदारांच्या माध्यमातून झालेली कामे लोकांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले. यावेळी नंदकुमार जेजुरकर, विजय काळे, बाबासाहेब फणसे, उत्तमराव घोरपडे, अनिता जगताप, डॉ़ राजेंद्र पिपाडा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन कमलाकर कोते यांनी केले.