अनधिकृत होर्डिंग्जला पालिकेच्या अधिकाऱ्यांचा वरदहस्त? पिता-पुत्र जोडगोळीचे प्रताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या होर्डिंग्जला परवाना विभागातील अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी स्थायी समितीत केला आहे. हा अधिकारी आपल्या मुलाच्या जाहिरात कंपनीला फायदा मिळवून देत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱयाची सखोल चौकशी करण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मंगळवारी दिले.

पुण्यात होर्डिंग्ज कोसळून झालेल्या भीषण अपघातानंतर मुंबईतील अनधिकृत होर्डिंग्जचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. अनधिकृत होर्डिंग्जमुळे केवळ बकालपणाच येत नाही तर नागरिकांच्या जिवालाही धोका असतो. मुंबईतही मोठ्या प्रमाणावर अनधिकृत होर्डिंग्ज आहेत, मात्र अशा होर्डिंग्जला परवाना विभागातील एका अधिकाऱ्याचा वरदहस्त असल्याचा आरोप रवी राजा यांनी स्थायी समितीमध्ये केला. परवाना विभागाचे उपअधीक्षक प्रकाश जाधव यांचा मुलगा प्रतीक जाधव हा एपीटी या जाहिरात कंपनीमध्ये काम करीत आहे. त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून आपल्या मुलाला फायदा मिळवून देण्याचे काम ते करीत आहेत. प्रतीक जाधवही वडिलांच्या पदाचा गैरवापर करीत मोठ्या कंपन्यांना धमकावून त्याच्या कंपनीबरोबर करार करण्यास भाग पाडत असल्याचा आरोप रवी राजा यांनी केला आहे. या अधिकाऱ्याला महापालिकेच्या सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून याबाबतचा अहवाल स्थायी समितीच्या पुढच्या बैठकीत आणण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्षांनी प्रशासनाला दिले. एपीटी कंपनीने मुंबईतील विक्रोळी, अंधेरी, बीकेसी आणि इतर ठिकाणी एकूण 55 जागांवर होर्डिंग्जसाठी करार केलेले आहेत. तुम्ही आमच्याबरोबर करार केले नाहीत तर तुमचे परवाने नूतनीकरण होणार नाहीत असे सांगून मोठ्या कंपन्यांना धमकावले जात असल्याचा आरोप रवी राजा यांनी केला आहे.

पदोन्नती रोखण्यासाठी आरोप?
दरम्यान, विरोधी पक्षनेत्यांनी केलेले आरोप प्रकाश जाधव यांनी फेटाळले आहेत. जाणीवपूर्वक बदनाम करून आपले पदोन्नती रोखण्यासाठी हा आरोप होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एपीटी कंपनीचे होर्डिंग्ज मुंबईत नाहीच असा दावा उपअधीक्षक प्रकाश जाधव यांनी केला आहे.