ऑनलाइन दारू मागवणे पडले महागात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑनलाइन दारूच्या नावाखाली वृद्धाच्या बँक खात्यावर डल्ला मारल्याची घटना घडली. ठगाने कोड पाठवत असल्याचे भासवून वृद्धाच्या बँक खात्यावर डल्ला मारला. फसवणूकप्रकरणी पवई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार हे पवई येथे राहत असून ते खासगी कंपनीत वरिष्ठ पदावर काम करतात. त्यांचे एका बँकेत संयुक्त खाते असून ते ऑनलाइन शॉपिंग केल्यावर पैसे इ-वॉलेटमधून देतात. काही दिवसांपूर्वी तक्रारदाराने घरी दारू मागवण्यासाठी ऑनलाइन नंबर सर्च केला. त्यानंतर तक्रारदाराला एक नंबर दिसला. त्यावर त्यांनी दारूची ऑर्डर करण्यासाठी फोन केला. फोन उचलणाऱ्या ठगाने आपण वाईन शॉपमधून बोलत असल्याचे भासवले. ऑनलाइन दारूची ऑर्डर केल्यानंतर लगेच पैसे द्यावे लागतील असे सांगून तक्रारदाराला दारूचे 8 हजार रुपये ऑनलाइन पाठवण्यास भाग पाडले. पैसे पाठवल्यावर ठगाने दारूच्या नोंदणीसाठी कोड आवश्यक असल्याचे सांगून एक कोड पाठवला. कोड पाठवल्यावर तक्रारदाराला संशय आल्याने त्यांनी ऑनलाइन पाठवलेले पैसे परत करण्यास सांगितले. तेव्हा ठगाने आपण पैसे परत करत असल्याचे सांगून तक्रारदाराच्या मोबाईलवर एक कोड पाठवला. तो कोड पाठवल्यावर रक्कम परत केली जाईल अशा भूलथापा मारल्या. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने आलेला कोड हा ठगाला पाठवला. कोड पाठवताच तक्रारदाराच्या खात्यातून 96 हजार रुपये काढले गेले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पवई पोलीस ठाण्यात धाव घेतली.