यूपीमध्ये सपाला धक्का, माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या मुलाचा भाजपमध्ये प्रवेश

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार आणि माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे सुपुत्र नीरज शेखर यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. मंगळवारी भाजपचे सरचिटणीस भुपेंद्र यादव यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी कमळ हाती घेतले. 2020 मध्ये नीरज शेखर यांचा कार्यकाळ संपणार होता, परंतु एक वर्ष आधीच त्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला.

याआधी सोमवारी नीरज शेखर यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राज्यसभा अध्यक्षांनीही त्यांचा राजीनामा स्वीकारला होता. त्यानंतर मंगळवारी सकाळी संसद भवन परिसरामध्ये भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकरू यांची नीरज शेखर यांनी भेट घेतली होती. तत्पूर्वी त्यांनी भाजपचे अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली होती. तेव्हापासून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली.

अखिलेशसोबत तणाव
गेल्या काही काळापासून नीरज शेखर आणि सपाचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यात तणाव होता. लोकसभा निवडणुकीवेळी नीरज शेखर यांनी पांरपारिक बलिया मतदारसंघातून तिकीट मागितले होते, परंतू पक्षाने त्यांना तिकीट दिले नाही. तेव्हापासून ते नाराज होते.

आपली प्रतिक्रिया द्या