शॉर्ट सर्किटमुळे तब्बल 70 एकर ऊसचा कोळसा; शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील आवाड शिरपुरा येथील उंदरी नदीकाठच्या परिसरात विजेच्या शॉटसर्किटमुळे तब्बल 70 एकर ऊसाचा कोळसा झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी अग्नीशमन दलाच्या गाडीसाठी फोन केले परंतु गाडी नादुरुस्त असल्याची उत्तरे मिळाल्याने कारखान्यालगतच असलेला ऊस आगीमध्ये खाक झाला. मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली.

रांजणी येथील एनसाई साखर कारखाना कार्यक्षेत्रातील आवाड शिरपूरा येथील उंदरी नदीकाठ जवळील रोहित्र असून शॉटसर्किटने तब्बल 70 एकरातील ऊस जळून कोळसा झाला आहे. त्यामुळे10 ते 15 शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच कळंब येथील नगरपालिकेच्या अग्निशमन गाडीला शेतकऱ्यांनी फोन करून फोन केला होता, परंतु आगीने रूद्र रूप धारण केल्याने आग आटोक्यात आली नाही.

काही शेतकऱ्यांनी रांजणी येथील एनसाई साखर कारखान्याला फोन करून आग विझविण्यासाठी अग्निशमन गाडीची मागणी केली, परंतु गाडी नादुरुस्त असल्याचे सांगण्यात आल्याने आग आटोक्यात आली नाही. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.