
>> प्रतिनिधी
‘ओवी’ हे मराठी नाटक आता गुजराती प्रेक्षकांसाठीही सादर होतंय. या नाटकाचे मूळ मराठी लेखक-दिग्दर्शक अनिकेत पाटील याचं हे पहिलंवहिलं व्यावसायिक नाटक. यानिमित्त त्याच्याशी साधलेला हा संवाद…
प्रत्येक व्यक्तिला कशाची ना कशाची तरी भीती असतेच. या भीतीवरच आधारलेलं ‘ओवी’ हे मराठी नाटक आता गुजराती प्रेक्षकांसाठीही सादर होतंय. कबीर प्रॉडक्शन आणि सरगम क्रिएशनची प्रस्तुती असलेले इम्तियाज पटेल लिखित या गुजराती नाटकाचा शुभारंभ नुकताच पार पडला. या नाटकाचे मूळ मराठी लेखक-दिग्दर्शक अनिकेत पाटील याचं हे पहिलंवहिलं व्यावसायिक नाटक. या नाटकाच्या निमित्ताने तो गुजराती रंगभूमीवरही पाऊल ठेवतोय.
मराठी भाषेतील या नाटकाने खूप हाऊसफुल्ल प्रयोग घेतले आहेत. ‘ऑल दि बेस्ट’प्रमाणेच हे २० वर्षांनी गुजरातीमध्ये येतय. गुजराती प्रेक्षकांच्या मागणीनुसार हे नाटक गुजरातीमध्ये आम्ही करतोय. कारण ‘ओवी’ नाटक मराठीत सादर होत असताना ते बघण्यासाठी गुजराती प्रेक्षकही मोठय़ा प्रमाणात यायचा. मराठी नाटकाचा आनंद घेण्यासाठी पंजाबी, गुजराती असा अमराठी प्रेक्षकही येतो. त्यांच्या सांगण्यानुसार ‘या नाटकाचा जॉनर आणि कथा गुजरातीलाही मोठा प्रतिसाद देईल’, यामुळे हे नाटक गुजराती भाषेत करण्याचा निर्णय घेतला. महत्त्वाचे म्हणजे गुजरातीतही या नाटकाचे नाव ‘ओवी’हेच राहणार असल्याचे लेखक-दिग्दर्शक अनिकेत पाटील सांगतात.
ते म्हणतात, नाटकाची संहिता गुजरातीत असल्यामुळे ती मला वाचू शकत नाही. सुरुवातीला दोन-तीन दिवस शिकण्यात गेले. आता संवाद मला कळू लागले आहेत. गुजरातीतला भाग हिंदीमध्ये समजावून घेतो. हीही शिकण्यातली मजा या नाटकामुळे मला अनुभवता येत आहे.
गुजराती रंगभूमीसाठी वेगळा विषय
हॉरर जॉनरचं हे नाटक गुजराती प्रेक्षकांसाठी येतंय. त्यामुळे ज्या गुजराती भाषिक प्रेक्षकांनी ते पाहिलं नाही. त्यांच्यासाठी हे पूर्णतः नवीन आहे. आतापर्यंत गुजरातीमध्ये कॉमेडी नाटकं सादर होण्याकडे कल असतो, पण भीतीदायक जॉनर असलेलं हे नाटक खूप वर्षांनी अमराठी प्रेक्षकांना बघायला मिळेल. विशेषतः एक वेगळा विषय गुजराती रंगभूमीवर येतोय, अभिनेते महेश मांजरेकर आणि अजय कासुर्डे यांच्या संकल्पनेतून ‘ओवी’ गुजरातीत साकारतोय, असे मत ते व्यक्त करतात.
काही नवे बदल
या नाटकातील बदलांविषयी अनिकेत यांचे म्हणणे आहे की, गुजरातीमध्ये नाटक सादर करताना मूळ कथा तीच राहणार आहे, मात्र काही लहान-मोठे बदल यामध्ये केले जाणार आहेत. कपाट उडणं, अचानकपणे एखादी व्यक्ति अदृश्य होणे, कुठूनही कोणाचाही प्रवेश होणे, माणसे हवेत हलणे असे भीतीदायक स्पेशल इफेक्टस् ‘ओवी’मध्ये पाहायला मिळतात. ही दृष्ये दाखवताना ज्या ट्रिक्स आम्ही मराठी नाटकात दाखवू शकलो नाही. त्या गुजरातीमध्ये दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.




























































