पाच वर्षांत 96 हजार मुंबईकरांना आंतरराष्ट्रीय वाहन परवाने मिळाले; परदेशात शिक्षण, नोकरी, पर्यटन, दीर्घकालीन वास्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिक्षण, नोकरी, पर्यटन, दीर्घकालीन वास्तव्यासाठी परदेशात जाणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय वाहन परवान्यांची मागणीदेखील वाढली आहे. गेल्या पाच वर्षांत जवळपास 95 हजार 935 मुंबईकरांना आंतरराष्ट्रीय वाहन परवाने म्हणजेच इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिट-आयडीपी मिळाले असून मागणीत सातत्याने वाढ होत असल्याचे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हिंदुस्थानातील वाहन परवानाधारकांना संबंधित देशांमध्ये कायदेशीररित्या वाहन चालवण्याची परवानगी मिळावी यासाठी मुंबईतील विविध प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मुंबई सेंट्रल, वडाळा, अंधेरी व बोरिवली आरटीओच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय वाहन परवाने दिले जातात. या चारही आरटीओंपैकी एकट्या मुंबई सेंट्रल आरटीओच्या वतीने सर्वाधिक 27 हजार 657 आंतरराष्ट्रीय वाहन परवाने जारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षण, नोकरी, पर्यटन, दीर्घकालीन वास्तव्याचे कारण देत अर्जदारांनी अमेरिका, कॅनडा, दुबई, जपानसह युरोपीयन देशांतील आंतरराष्ट्रीय वाहन परवान्यासाठी प्रमुख पसंती दिल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

ऑनलाईन प्रक्रियेमुळे अर्जदारांची संख्या वाढली

अर्जदारांना आरटीओ कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत यासाठी परिवहन विभागाने ‘सारथी’ पोर्टलद्वारे ही सेवा सुरू केली. पोर्टलच्या मदतीने विद्यमान वाहन परवाना, पासपोर्ट आणि आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन सादर करून अपॉईनमेंट घेणे सोपे झाले. मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी आरटीओ कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून परवाना मिळवणे सोपे झाले. या ऑनलाईन प्रक्रियेमुळे अर्जदारांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे.