
‘ऑक्सफॅम’ संस्थेच्या अहवालात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हिंदूस्थानातील 21 अब्जाधीशांकडे देशातील 70 कोटी जनतेपेक्षा जास्त संपत्ती आहे. ज्यावेळेस संपूर्ण देश कोरोनाशी झगडत होता त्यावेळेस हिंदूस्थानातील अब्जाधीश मात्र दिवसाला 3 हजार 608 कोटी रुपये कमवत होते. ही माहिती ‘ऑक्सफॅम’ च्या अहवालात देण्यात आली आहे. हा अहवाल आज स्विझर्लंडमधील दावोस येथे वर्लड इकोनॉमिक फोरमच्या परिषदेत सादर केला जाणार आहे. कोरोना महामारीनंतर श्रीमंत आणि गरीब यांच्यात वाढलेल्या दरीबाबत जगभर चर्चा सुरु आहे. हिंदूस्थानासारख्या विकसनशील देशामध्ये हा फरक प्रकर्षाने दिसून येतं आहे.
‘ऑक्सफॅम’ च्या अहवालानूसार, 2020 मध्ये कोरोना माहामारीची सुरुवात झाली. 2021 च्या नोव्हेंबरपर्यंत हिंदूस्थानात अनेकांचा रोजगार हिरावला गेला. परिणामी अनेकांना बचत केलेले पैसे वाचवण्यासाठी धडपड करावी लागली. मात्र याच काळात अब्जाधीशांच्या संपत्तीमध्ये तब्बल 121 कोटी रुपये इतकी भर पडली असून याच काळात भांडवलदारांच्या संपत्तीमध्ये दिवसाला 3 हजार 608 कोटींची वाढ होत होती. दरम्यान, 2021 मध्ये देशातील एकूण संपत्तीच्या 62% पेक्षा जास्त संपत्ती फक्त 5% हिंदूस्थानी नागरिकांकडे होती, तर दुसरीकडे 50% लोकसंख्येकडे केवळ 3% संपत्तीचा हिस्सा आहे. “सर्व्हायव्हल ऑफ द रिचेस्ट: द इंडिया स्टोरी” या नावाने ‘ऑक्सफॅम’ च्या अहवालात हे प्रकाशित करण्यात आले आहे. या अहवालानुसार हिंदूस्थानात 2020 मध्ये अब्जाधीशांची संख्या 102 एवढी होती जी 2022 मध्ये 166 एवढ्या संख्येने वाढली आहे.
हिंदूस्थानातील 100 अब्जाधीशांची एकत्रित संपत्ती ही 54.12 लाख कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. ही रक्कम 18 महिन्यांहून अधिक काळ संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्पालाठी निधी देऊ शकते, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अब्जाधीशांच्या एकूण संपत्तीवर जर 2% कर लावला तर, देशातील पुढील तीन वर्षांची कुपोषणाची समस्या मिटू शकेल. तसेच यातून कुपोषित बालकांसाठीच्या योजनेला 40 हजार 423 कोटी मिळू शकतात. असे या अहवालात म्हटले आहे. या अहवालाबाबत बोलताना ऑक्सफॅम इंडिया संस्थेचे हिंदूस्थानातील मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमिताभ बेहर म्हणाले की, देशातील उपेक्षित, आदिवासी, महिला आणि अनौपचारिक क्षेत्रातील कामगार यांना सरकारच्या अप्रत्यक्ष करामुळे आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे देशातील सर्वात श्रीमंत नागरिकांवरील कराचा बोजा वाढणे अधिक योग्य ठरणार आहे.



























































