
पालिकेच्या गोवंडी शताब्दी रुग्णालयात ऑक्सिजन जनरेटर युनिट आजपासून सुरू झाले आहे. ‘सीएसआर’च्या माध्यमातून रुग्णालयात नव्याने कार्यान्वित झालेला हा मुंबईतील पहिला ऑक्सिजन प्रकल्प आहे. आरसीएफच्या ‘सीएसआर’ निधीतून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. यामुळे पूर्व उपनगरातील वैद्यकीय ऑक्सिजनच्या तुटवडय़ाची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.
कोरोनाच्या दुसऱया लाटेत विषाणूच्या नव्या स्ट्रेनमुळे रुग्णांना ऑक्सिजनची गरज निर्माण झाली. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘मिशन ऑक्सिजन’च्या माध्यमातून राज्याला ऑक्सिजन पुरवठय़ाबाबत स्वयंपूर्ण करा असे आवाहन केले होते. खासदार राहुल शेवाळे यांनी यासंदर्भात आरसीएफ, बीपीसीएल, एचपीसीएल, बीएआरसी यांसारख्या आस्थापनांना ऑक्सिजन निर्मितीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत आरसीएफ कंपनीच्या ‘सीएसआर’ निधीतून गोवंडीच्या पं. मदनमोहन मालवीय शताब्दी रुग्णालयात ऑक्सिजन जनरेटर युनिट उभारण्यात आले. या ऑक्सिजन जनरेटर युनिटद्वारे दिवसाला 9 किलो क्षमतेचे सुमारे 102 ऑक्सिजन सिलिंडर्स भरू शकतील इतक्या ऑक्सिजनची निर्मिती करण्यात येणार आहे. या युनिटच्या लोकार्पणप्रसंगी विभागप्रमुख मंगेश सातमकर, आमदार प्रकाश फातर्पेकर, आरसीएफचे अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.






























































