पीक विम्यातील घोटाळा राफेलपेक्षाही मोठा; ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । माजलगाव

प्रधानमंत्री पीक विमा योजना म्हणजे सरकारच्या कार्यकाळात होत असलेला सर्वात मोठा घोटाळा असल्याचा घणाघात ज्येष्ठ पत्रकार व ‘हिंदू’चे संपादक पी. साईनाथ यांनी केला. सोमवारी माजलगाव पत्रकार संघातर्फे राजस्थानी मंगल कार्यालयात दर्पण पुरस्कार वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास शिवसेना उपनेत्या तथा प्रवक्त्या नीलम गोऱ्हे , नगराध्यक्ष सहाल चाऊस, तर व्यासपीठावर संपादक गंमत भंडारी, ऍड. वसंत सोळंके, मोहन जगताप, सभापती अशोक डक, उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार आदींची उपस्थिती होती.

यावेळी पी. साईनाथ म्हणाले, राफेल ही वर्षभरात एकदाच होणारी प्रक्रिया असून, प्रधानमंत्री विमा योजना ही वर्षानुवर्षे चालणारी सर्वात मोठी फसवी योजना आहे. त्यातून खासगी कंपन्यांना नफ्यात आणण्याचे काम होत असल्याची टीका त्यांनी केली. विमा योजना ही केवळ शेतकऱ्यांची लूट आहे. यात सरकारी संस्था या तोट्यात गेल्या असून, खासगीकरणास मोठा वाव या सरकारने दिला आहे. या योजनेचा भंडाफोड झालाच पाहिजे, देशातील आठ ते दहा राज्यांत भीषण दुष्काळ आहे, हे एक सामाजिक संकट आहे. त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहेत. शेतकऱ्यांच्या वेदना या सरकारने समजून घेऊन शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न करावा. देशात झालेल्या शेतकरी आत्महत्यांचा अहवाल हा सरकारने बंद केला आहे, ही बाब गंभीर असल्याचेही ते म्हणाले. तीन ते चार वर्षांपासून देशात असमानतेत मोठी वाढ झाल्याची खंतदेखील त्यांनी व्यक्त केली. यावेळी संपादक गंमत भंडारी आणि ऍड. कसंत सोळंके यांना समाजभूषण आणि दर्पण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्या दोघांनीही मनोगत व्यक्त केले.