
पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील सर्वोपचार रुग्णालयातील (सांगली सिव्हिल) नव्याने 500 बेड्सच्या हॉस्पिटलसाठी 233 कोटींच्या प्रस्तावास आज मंत्रालयात झालेल्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी बैठक घेऊन प्रस्तावमंजुरीचा आदेश दिला होता. या मंजूर प्रस्तावामध्ये 500 बेड्सचे चारमजली हॉस्पिटल तसेच 200 निवासी डॉक्टरांसाठी तीनमजली वसतिगृह आणि अद्ययावत शवागाराच्या इमारतीचा समावेश आहे. सुमारे 52 हजार 673 चौरस मीटर बांधकाम होणार आहे.
वसंतदादा रुग्णालयात सध्या 280 बेड्सची व्यवस्था आहे. ही व्यवस्था फारच अपुरी पडत होती. त्यावरील ताण सातत्याने वाढत चालला होत. तसेच मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या दीडशे विद्यार्थी क्षमतेनुसार या बेड्सची संख्या अपुरी पडत होती. याबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी संबंधित खात्याचे सचिव आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक लावण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार 23 फेब्रुवारी रोजी ही बैठक झाली. या बैठकीत नव्या हॉस्पिटलचा परिपूर्ण प्रस्ताव पाठविण्याचा आदेश अधिष्ठातांना दिला होता. त्यानुसार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन, तसेच सार्वजनिक बांधकाम मंडळ मिरजचे कार्यकारी अभियंत्यांनी हा प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावाला मंत्री देशमुख यांनी मान्यता देऊन तो मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीकडे पाठविला होता. आज झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत त्याला मान्यता देण्यात आली.
पश्चिम महाराष्ट्रात सांगली हे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे सांगली, कोल्हापूर हे जिल्हे, तसेच सीमाभागातील लोकांना या नव्या रुग्णालयाचा चांगला लाभ होणार आहे. हे रुग्णालय होणे फार निकडीचे होते. सर्व प्रकारच्या सुविधा या नव्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होणार आहेत, असे काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले आहे.


























































