ईदच्या मिरवणुकीत झालेल्या आत्मघाती स्फोटामागे ‘रॉ’चा हात, दहशतवादी पोसणाऱ्या पाकड्यांचा कांगावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानमधील बलुचिस्तान (Balochistan) प्रांतामध्ये ईदच्या मिरवणुकीमध्ये दोन आत्मघाती स्फोट झाले. या स्फोटांमध्ये पोलीस उपअधीक्षकासह 65 जणांचा मृत्यू झाला, तर शेकडो जण गंभीर जखमी झाले. जखमींमधील काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या स्फोटानंतर पाकिस्तानने हिंदुस्थानवर गंभीर आरोप केले आहेत. बलुचिस्तामध्ये झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटांमध्ये हिंदुस्थानची गुप्तचर संस्था ‘रॉ’चा हात असल्याचा कांगावा पाकिस्तानने केला.

पाकिस्तानचे गृहमंत्री सफराज बुगती (Sarfaraz Bugti) यांनी बलुचिस्तानमध्ये झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटासाठी हिंदुस्थानला जबाबदार धरले आहे. या आत्मघाती स्फोटांमध्ये हिंदुस्थानची गुप्तचर संस्था ‘रिसर्च अँड अॅनालिसिस विंग’ (Research & Analysis Wing) अर्थात रॉचा हात असल्याचा दावा त्यांनी केला. मस्तुंग येथील आत्मघातकी बॉम्बस्फोटात सामील असलेल्या घटकांना पाकिस्तानी लष्कर आणि इतर सर्व संस्थांकडून जशास तसे उत्तर दिले जाईल. या हल्ल्यात ‘रॉ’ सामील आहे, असे ते म्हणाले. ‘इंडिया टूडे’ने याबाबत वृत्त दिले आहे.

बलुचिस्तानमधील मस्तुंग येथे मदिना मशिदीजवळ झालेल्या आत्मघाती स्फोटामध्ये 60हून अधिक लोक ठार झाले, तर 60हून अधिक लोक जखमी झाले. दुसरा आत्मघाती स्फोट खैबर पख्तुनख्वाच्या हंगू येथे झाले. हल्लेखोरांनी मशिदीला लक्ष्य केले. स्फोटामुळे मशिदीचे छत कोसळले आणि 5 जण ठार झाले.

दरम्यान, या दोन्ही स्फोटांची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. हा स्फोटामध्ये पाकिस्तानमधील प्रतिबंधित तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचा हात असल्याचा अहवाल समोर आला आहे. या हल्ल्यानंतर बलुचिस्तानमधील काळजीवाहू सरकाररने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.