
पाकिस्तानच्या कैदेत असलेले कुलभूषण जाधव यांच्या बचावासाठी हिंदुस्थानी वकील नेमण्यास पाकिस्तान सरकारने नकार दिला आहे. जाधव यांना हिंदुस्थानी वकील द्यायचा म्हणजे आमच्या कायद्यात बदल करावा लागेल असे कारण सांगत पाकिस्तानने हिंदुस्थानची मागणी फेटाळली आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जाहिद हफीज चौधरी यांनी सांगितले की, ज्या वकिलाकडे पाकिस्तानात कायद्याचा अभ्यास करण्याचा परवाना आहे, तोच वकील जाधव यांचे प्रतिनिधित्व करू शकतो.
इस्लामाबाद हायकोर्टाने 3 सप्टेंबर रोजी कुलभूषण जाधव प्रकरणाची सुनावणी एक महिन्यांनी पुढे ढकलली होती. त्यावेळी जाधव यांच्यासाठी वकील नेमण्याची हिंदुस्थानला आणखी एक संधी दिली जावी, असे निर्देश इस्लामाबाद उच्च न्यायालयाने पाकिस्तान सरकारला दिले होते.






























































