डॉक्टर असल्याचा बनाव करत सुरक्षा रक्षकाने केली शस्त्रक्रिया…रुग्णाचा मृत्यू…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारीच्या काळात डॉक्टर आणि आरोग्य सेवकांची कमतरता जाणवत आहे. त्याचा गैरफायदा काहीजण घेत आहेत. पाकिस्तानात डॉक्टर असल्याचा बनाव करत एका सुरक्षा रक्षकाने महिला रुग्णावर शस्त्रक्रिया केली. तसेच या शस्त्रक्रियेचे पैसेही वसूल केले. मात्र, रुग्णाची तब्येत बिघडल्यानंतर नातेवाईक रुग्णालयात आले असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पाकिस्तानातील लाहोर येथील मेयो रुग्णालयातील ही घटना घडली आहे. द गार्डियनच्या वृत्तानुसार शमिमा बेगम नावाच्या 80 वर्षीय महिलेच्या पाठिला जखम झाल्याने शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यासाठी दोन आठवड्यांपूर्वी शमिमा रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्य़ांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र ती शस्त्रक्रिया डॉक्टरांनी न करता एका सुरक्षा रक्षकाने केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

रुग्णालयाच्या एका अधिराऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, मेयो रुग्णालय नावाजलेले आहे. मात्र, प्रत्यक्षात येथे काय चालते, याकडे कोणाचेच लक्ष नाही. या घटनेमुळे ही बाब लक्षात आली आहे. रुग्णालयातील सुरक्षा रक्षकाने महिलेची शस्त्रक्रिया कशी केली, याबाबत कोणालाच काहीच माहित नाही. सुरक्षा रक्षक शस्त्रक्रिया विभागापर्यंत कसा पोहचला. त्याला शस्त्रक्रिया करण्याची परवानगी कोणी दिली. तसेच हे सर्व घडले तरी रुग्णालयाला काहीच माहिती नव्हते, हे गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शस्त्रक्रियेवळी सुशिक्षित तंत्रज्ञ होता. त्यालाही याचा संशय कसा आला नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शस्त्रक्रिया झाल्यानंतर शमिमांना डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले. तिने डॉक्टरांना त्यांची फी दिली. विशेष म्हणजे हा सुरक्षा रक्षक शमिमांला ड्रेसिंग करण्यासाठी त्यांच्या घरीही गेला होता. मात्र, महिलेच्या जखमेतून रक्त थांबत नव्हते आणि दुखणं वाढले, त्यामुळे नातेवाईकांनी महिलेला रुग्णालयात आणले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांना या धक्कादायक घटनेबाबत माहिती मिळाली. पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजेल, असे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी लाहोर पोलीस प्रवक्ते अली सफदर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शस्त्रक्रिया करणाऱ्या रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली आहे. हा सुरक्षा रक्षक डॉक्टर असल्याचे भासवून रुग्णांवर उपचार करत होता. याआधीही तो अन्य रुग्णांच्या घरी गेला आहे. हा सुरक्षा रक्षकाला रुग्णांकडून पैसे उकळत असल्याने त्याला दोन वर्षांपूर्वी रुग्णालयातून काढून टाकण्यात आले होते, अशी माहिती मिळाली आहे.