
पाकिस्तानमधील गिलगिट आणि बाल्टिस्तानजवळ एका प्रवासी बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू झाला असून 26 जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना शनिवारी संध्याकाळी 6.30 वाजता चिलासच्या हुदूर परिसरात घडली असून या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.
डायमेरचे उपायुक्त आरिफ अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार, बसवर झालेल्या हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये दोन लष्करी जवानांचाही समावेश आहे तर विशेष सुरक्षा युनिटचा एक जवानासह 26 जण जखमी झाले आहेत. 8 जणांपैकी 5 जणांची ओळख पटली आहे तर 3 जणांची ओळख पटायची बाकी आहे. तर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डायमेरचे पोलीस अधीक्षक सरदार शहरयार यांनी सांगितले की, या घटनेची प्रतिक्रिया देणारे पोलीस अधिकारी पहिले होते, त्यांनी मृत आणि जखमींना रुग्णालयात नेले.
पोलिसांनी सांगितले की, बस गिलगिटहून रावळपिंडीला जात होती. दरम्यान सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. अचानक झालेल्या हल्ल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली.
बहुतेक लोक कोहिस्तान, पेशावर, घिझर, चिलास, रौंदू, स्कर्दू, मानसेहरा आणि स्वाबी भागातील होते. तर त्यातील एक -दोनजण सिंधमधील होते. हल्ल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून जाण्यास यशस्वी झाले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी हल्ल्याचा तपास सुरु असून दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शओध मोहीम सुरु केली आहे. अजूनपर्यंत कोणी या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. मात्र या परिसरात याआधीही दहशतवादी हल्ले झाले आहेत.





























































