पाकडय़ांच्या कुरापती वाढल्या, 300 ते 400 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत

जम्मू-कश्मीरातील कलम 370 हटवण्यात आल्यानंतर पाकडय़ांच्या पुरापती वाढल्या आहेत. गेल्या वर्षभरात पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटनांमध्ये 44 टक्क्यांची वाढ झाली आहे.

तसेच सध्या जवळपास 300 ते 400 पाकिस्तानी दहशतवादी नियंत्रण रेषेवर (एलओसी) घुसखोरीच्या तयारीत आहेत. त्यांना पाकिस्तानकडून दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जात आहे, असा सावधानगिरीचा इशारा लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी शुक्रवारी दिला.

लष्कर दिनानिमित्त आयोजित संचलनाच्या कार्यक्रमात जनरल नरवणे उपस्थित होते. या वेळी त्यांनी सीमेवरील पाकिस्तान आणि चीनच्या कुरापतींचा खुलासा केला. शस्त्रसंधी उल्लंघनाच्या वाढत्या घटनांमधून पाकिस्तानचा द्वेष दिसला आहे.

पाकडय़ांनी गेल्या वर्षभरात केलेल्या दहशतवादी कारवायांना लष्कराने सडेतोड उत्तर दिले. या काळात एलओसीवर जवळपास 200 हून अधिक दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. पाकिस्तानच्या पुरापतींवर हिंदुस्थानी सुरक्षा यंत्रणा बारीक लक्ष ठेवून आहेत, असे लष्करप्रमुखांनी सांगितले.

पाकिस्तानने गेल्या वर्षभरात 4700 वेळा शस्त्रसंधी उल्लंघन केले. मागील 17 वर्षांमध्ये पाकिस्तानकडून पहिल्यांदाच एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर गोळीबाराच्या घटना घडल्याचे जनरल नरवणे यांनी नमूद केले.

गलवान खोऱयातील जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही!

उत्तरेकडील सीमांवर चीन वारंवार कट-कारस्थाने करीत आहे. सीमेवरील वातावरण बिघडवण्यासाठी चीनच्या पुरापती सुरू आहेत. त्याला लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले आहे. मी देशाला आश्वासन देतो की, गलवान खोऱयातील शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही.

वादावर चर्चेतून तोडगा काढला जाईल. यासाठी राजकीय प्रयत्नही केले जातील. मात्र कोणीही आमच्या सहनशक्तीची परीक्षा घेण्याची चूक करू नये, असाही इशारा लष्करप्रमुखांनी चीन आणि पाकिस्तानला दिला.

आपली प्रतिक्रिया द्या