पालघरवासीयांनी मिंधेंच्या उमेदवाराला हाकलले! बंदराला विरोध करीत प्रचार रॅलीला दाखवले काळे झेंडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वतःच्या स्वार्थासाठी सतत पक्ष बदलणारे मिंध्यांचे दलबदलू उमेदवार राजेंद्र गावीत यांना आज पालघरच्या मुरबे गावातील ग्रामस्थांनी चांगलाच हिसका दाखवला. वाढवणप्रमाणेच मुरबे गावातील बंदर उभारण्याचा घाट सरकारने घातला असून त्याविरोधात गावीत यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. एवढेच नव्हे तर राजेंद्र गावीत चले जाव.. मुरबे गावात कोणत्याही परिस्थितीत बंदर होऊ देणार नाही, अशा जोरदार घोषणा ग्रामस्थांनी दिल्या. मुरबेवासीयांचा संताप व विरोध लक्षात घेऊन राजेंद्र गावीत यांनी रॅलीतून काढता पाय घेतला.

वाढवण बंदराला स्थानिक मच्छीमारांचा व रहिवाशांचा कडाडून विरोध असतानाही केंद्र सरकारने हे बंदर त्यांच्या माथी मारले. हे कमी की काय म्हणून पालघर जिह्यातील मुरबे गावातदेखील पीपीपी तत्त्वावर  नवे बंदर बांधण्याचा घाट घालण्यात आला आहे. जेएसडब्ल्यू इफ्रास्ट्रक्चर या कंपनीला त्याचे कंत्राट देण्यात आले असून 24 महिन्यांत बंदर उभारले जाणार आहे. 2030 पर्यंत 170 दशलक्ष टन प्रतिवर्ष इतक्या क्षमतेची कंटेनर हाताळणी या बंदरातून करण्याचे नियोजन आहे. वाढवणप्रमाणे मुरबेमध्ये हे बंदर झाल्यास मच्छीमार देशोधडीला लागणार असून अनेकांवर उपासमारीची वेळ येणार आहे.

मुरबे गाव हे पालघर विधानसभा मतदारसंघामध्ये येते. या गावातील लोकांना आमिषे दाखवून आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न मिंधे गटाचे उमेदवार राजेंद्र गावीत हे करीत आहेत.

रद्द करा रद्द करा.. मुरबे बंदर रद्द करा, अशा घोषणा देण्यात आल्या. राजेंद्र गावीत व त्यांच्या मिंधे कार्यकर्त्यांना विरोधाचा सामना करावा लागला. वाढवण बंदर रद्द, याही घोषणा देण्यात आल्या.

 मुरबेमधील मच्छीमार आक्रमक झाले असून आज गावीत यांची रॅली येताच त्यांचा संताप अनावर झाला. गावीत चले जाव अशा घोषणा देत गावकऱ्यांनी गावितांना घेरले.

‘त्या’ घोषणेचे काय झाले ?

स्वतःच्या स्वार्थासाठी मिंधेवासी झालेले राजेंद्र गावीत हे पालघर विधानसभेतून निवडणूक लढवत आहेत. मात्र त्यांना मुरबेमधील मच्छीमारांना आपण कोणता शब्द दिला होता याचा विसर पडला आहे.  खासदार होण्यापूर्वी त्यांनी प्रस्तावित बंदराच्या विरोधात भूमिका घेतली होती. एवढेच नव्हे तर बंदराचे काम सुरू झाल्यास आपण बुलडोझरखाली स्वतःला झोकून देऊ, अशी घोषणाही राणाभीमदेवी थाटात केली होती. आता या घोषणेचे काय झाले, असा थेट सवाल स्थानिकांनी आज प्रचार रॅलीच्या वेळेला केला. त्यावर गावीत मात्र निरुत्तर झाले व गावातून ते पळून गेले.

देशाचे सहकारमंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला

अमित शहा सांगली दौऱ्यावर येण्याआधीच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अमित शहा यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला येत आहेत, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी शहा यांच्यावर हल्ला चढवला. अमित शहा हे सांगलीत प्रचारसभा घेणार आहेत.  या देशात गरीब माणसांकडून टॅक्स मोठय़ा प्रमाणात गोळा केला जात आहे. श्रीमंत व्यक्तीला फक्त 5 टक्के टॅक्स तर  सामान्य माणसाला 24 टक्के टॅक्स द्यावा लागतो असेही ते म्हणाले.