
राज्यातील थंड हवेचे ठिकाण आणि निसर्गविविधतेने नटलेल्या महाबळेश्वरची पर्यटनाबरोबरच स्ट्रॉबेरी, केसर, लाल गहू, काळा गहू, निळा भात अशा उत्पादनांमध्ये आगळीवेगळी ओळख निर्माण झाली आहे. आता महाराष्ट्राचे मिनी कश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिसरात अक्रोडची शेतीही आता फुलू लागली आहे. प्रत्यक्ष कश्मीरमध्ये अक्रोडची शेती मोठय़ा प्रमाणात केली जाते. त्याच धर्तीवर महाबळेश्वर कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकरी वर्गामध्ये नवचैतन्य निर्माण करून नव्या प्रयोगाची चाचणी यशस्वी ठरली आहे. महाबळेश्वर, पाचगणी परिसरामध्ये अक्रोडची शेती यशस्वी ठरली आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील शेतकरी नव्या तंत्रज्ञानाची कास धरून हे तंत्र शेतात खेळवू लागला आहे. नव्या दमाने शेतात नवीन उपक्रम राबविले जात आहेत. महाराष्ट्राचे मिनी कश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरात केसर निर्मितीनंतर अक्रोडची शेतीही यशस्वी करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला आहे. कृषी विभागाच्या अनुभवातून नवनव्या कल्पना महाबळेश्वरचा शेतकरी राबवू लागला आहे. कश्मिरी केसरची जगभरात उत्कृष्ट केसर म्हणून ओळख आहे. त्याचबरोबर कश्मीरचा अक्रोडही उत्कृष्ट म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्राचे मिनी कश्मीर असलेल्या महाबळेश्वरातही आता उत्कृष्ट अक्रोड पर्यटकांना चाखायला मिळणार आहेत.
महाबळेश्वरात अक्रोडच्या लागवडीसाठी पोषक वातावरण
महाबळेश्वर समुद्रसपाटीपासून 1500 मीटर उंचीवर असून, येथील वातावरण अक्रोड लागवडीसाठी पोषक आहे. अक्रोडमधील मगज 2200 ते 2000 रुपये किलोप्रमाणे विकला जातो. त्यामुळे केसर व अक्रोडची निर्मिती झाल्यानंतर महाबळेश्वरच्या शेतकऱ्यांना शेतीत आधुनिक क्रांती करत जीवनमान उंचावणे शक्य होणार आहे. महाबळेश्वर येथे कृषिक्षेत्रात विविध लागवडीचे प्रयोग यशस्वी करून दाखवलेले कृषी पर्यवेक्षक दीपक बोर्ड यांनी महाराष्ट्रात प्रथमच अक्रोड लागवडीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे.
कागजी वाणाची लागवड
अक्रोडच्या ‘कागजी’ या वाणाची लागवड महाबळेश्वर तालुक्यातील बुरडाणी, तळदेव, महाबळेश्वर, झांजवाड इत्यादी गावांमध्ये करण्यात आली आहे. रोपांची वाढ अतिशय सुदृढ आहे. कागजी या वाणाची रोपे हिमाचल प्रदेश येथून आणली आहेत. साधारण 50 रोपांची लागवड प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आली आहे. अक्रोडच्या झाडाला 5-6 वर्षांनंतर फळे येतात. सध्या बुरडाणी येथील चंद्रकांत मोरे यांच्या शेतात रोपांची वाढ अतिशय सुदृढ झाली असून, रोपे 3-4 फूट उंचीची झालेली आहेत. कागजी अक्रोडला 100 वर्षे फळधारणा होते. साधारण 25 ते 35 किलो अक्रोड फळाचे उत्पादन एका झाडापासून मिळते.



























































