
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा आणि बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या (दि. 17) सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक प्रशासन सज्ज झाले आहे. पंढरपूर विधानसभेसाठी 19 उमेदवार रिंगणात असून, राष्ट्रवादीचे भगीरथ भालके आणि भाजपचे समाधान आवताडे यांच्यात मुख्य लढत होणार आहे. बेळगाव लोकसभेसाठी 10 उमेदवार रिंगणात असले तरी महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके, भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी आणि काँग्रेसचे सतीश जरकीहोळी यांच्यात मुख्य लढत होणार आहे. प्रस्थापितांच्या विरोधात मराठी भाषिक शुभम शेळके यांच्यासाठी एकवटले असून, शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या रॅली आणि जाहीर सभेने बेळगावात झंझावात निर्माण केला आहे.
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत 524 मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. निवडणूक निर्भय, निःपक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदान अधिकारी, कर्मचारी व मतदान साहित्य 94 एसटी बसेस व 3 जीपद्वारे पोहोच करण्यात आले आहे.
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 1 लाख 78 हजार 190 पुरुष मतदार व 1 लाख 62 हजार 694 स्त्राr मतदार तसेच इतर 5 असे एकूण 3 लाख 40 हजार 889 मतदार आहेत. मतदारसंघात 524 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. यामध्ये 328 मूळ मतदान केंद्रे 196 सहाय्यक मतदान केंद्रे आहेत. या मतदान केंद्रासाठी 524 कंट्रोल युनिट, 1048 बॅलेट युनिट व 524 व्हीव्हीपॅट मशीन असणार आहेत. तसेच, 210 कंट्रोल युनिट, 524 बॅलेट युनिट राखीव ठेवण्यात आल्या आहेत. निवडणुकीसाठी 2552 अधिकारी-कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, कर्मचारी व मतदान साहित्य वाहतुकीसाठी 94 एसटी बसेस व तीन जीपची व्यवस्था करण्यात आली.
मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रावर स्वच्छ पिण्याचे पाणी, पुरेसा वीजपुरवठा, शौचालय, दिव्यांगासाठी रॅमची सुविधा करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक होत असल्याने मतदान केंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गुरव यांनी दिली.
बेळगावात 2566 मतदान केंद्रे
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून, शनिवार 17 एप्रिल रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत दोन हजार 566 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. 18 लाख 13 हजार 567 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पोलीस खात्यानेही याची सर्व तयारी केली आहे. सुमारे तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आयुक्तांपासून उपनिरीक्षकांपर्यंत सर्व अधिकारी, पोलीस कर्मचारी, होमगार्ड्स व अन्य विविध तुकडय़ा बंदोबस्तावर राहणार आहेत. शुक्रवारी निवडणूक कर्मचाऱयांना मतदानयंत्र व अन्य निवडणूक साहित्य जिल्हाधिकारी के. हरीशकुमार यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आले. तसेच मुक्त, निर्भय आणि कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित वातावरणात सुरळीतपणे निवडणूक होण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱयांनी दिल्या आहेत.

























































