
मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निरायम आरोग्यासाठी पंढरपूर मधील वारकरी संप्रदायातील प्रमुख महाराज मंडळी आणि शिवसैनिकांनी श्री विठ्ठल मंदिरातील श्री संत नामदेवरायांच्या समाधीचे पूजन करुन मुख्यमंत्र्यांना लवकर बरे कर, असं साकडे श्री विठ्ठलाला घातले आहे.
मुंबई येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये श्री ठाकरे यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या आजारातून ते लवकर बरे व्हावेत यासाठी श्री विठ्ठलाला साकडे घालण्यात आले. यावेळी हभप तात्या महाराज चौगुले, हभप सतीश महाराज कंधारकर, हभप नारायण दीघे यांच्यासह वारकरी भाविक उपस्थित होते. यावेळी बोलताना ह.भ.प.तात्या महाराज चौगुले म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने नव्हे तर राज्यातील सामान्य जनतेचे कुटूंब प्रमुख म्हणून कोरोनाच्या संकट काळात मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेची अतिशय काळजी घेतली. कोरोनाचे संकट दूर होताच विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर झालेल्या भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे खुले केल्याने आता कार्तिकी वारीच्या ओढीने भाविक पंढरपूरकडे येऊ लागले आहेत. अशातच 65 वर्षावरील वृद्ध आणि लहान बालके यांनाही मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय घेऊन मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. ते या आजरातून लवकर बरे होवोत आणि त्यांना निरामय दीर्घायुष्य लाभो या साठी आज संत नामदेव महाराज यांच्या समाधीस्थळी विधीवत पूजा करून, तुळशी अर्चना करून भाविकांच्या वतीने साकडे घालण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.




























































