
सामना प्रतिनिधी । बीड
संपूर्ण राज्याचे लक्ष ज्या परळीकडे लागलेले असते त्या परळीच्या वैद्यनाथाचे राजकीय मैदान आता चांगलेच तापले आहे. पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी आपल्या भाषणामध्ये नाव न घेता विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर विखारी टिका केली. त्या आपल्या भाषणात म्हणाल्या, प्रत्येक २० किलोमिटरला ज्यांचा वारसा बदलतो त्यांचे राजकारणच तोडपाणीचे झाले आहे. विधीमंडळात लक्षवेधीचा रेट लावणारे मुंडेंचे वारसदार असू शकत नाहीत, या शब्दात पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी समाचार घेतला.
परळीत काल पाच कोटी रुपयांच्या अंतर्गत सिमेंट रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाला. यावेळी व्यासपीठावर खा. प्रितम मुंडे, आ.आर.टी. देशमुख, आ.सुरेश धस, आ.संगिता ठोंबरे, रमेश आडसकर उपस्थित होते. यावेळी बोलतांना पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, मुंडे साहेबांनी शहराच्या भविष्याची दोरी माझ्या हातात दिली आहे. त्यामुळे माझी परळी मला स्वच्छ, सुंदर आणि भयमुक्त करायची आहे. माझी काही चुक झाली असेल तर मला माफ करा, पण मला नालायक लोंकांच्या पुढे झुकण्याची वेळ येऊ देवू नका. राज्यात येणाऱ्या सरकारमध्ये माझं मोठं योगदान असणार आहे. शहरातील गुंडगिरी संपवण्यासाठी मी जनतेच्या पाठीशी आहे. समोरुन येणारा वार मी अगोदर माझ्या खांद्यावर झेलेल, निर्भयपणे जगा घाबरु नका, असा विश्वास देत ज्या दिवशी मला घालवाल. त्यादिवशी तुमचे परळीत राहणे आवघड होईल, अशा शब्दात त्यांनी भविष्याची चाहूल दिली.
विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर विखारी टिका केली. त्या म्हणाल्या मयत माणसाच्या जमिनी लिहून घेणारे आम्ही नाही आहोत. मी मुंडे साहेबांची वारसदार आहे. माझ्या वडिलांचे नाव मी लावते म्हणून अनेकांना त्रास होतो. एकीकडे मुंडेसाहेबांचा वारसा सांगायचा आणि दुसरीकडे त्यांचा अवमान करण्याचा काही जणांचा उद्योग आहे. प्रत्येक वीस किलो मिटरला ज्यांचा वारसा बदलतो त्यांचे राजकारणच तोडपाणी करुन होत आहे. त्यांनी नेमका आपला वारसा कोणाचा? हे एकदा ठरवूनच घ्यावे, अशा भाषेत पंकजा मुंडेंनी टिकास्त्र सोडले. तत्पूर्वी खा.प्रितम मुंडे यांनीही आपल्या भाषणामध्ये बोलतांना राष्ट्रवादीवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, पंकजातार्इंना विरोध करण्यासाठी राष्ट्रवादीने विरोधीपक्ष नेतेपद या भागाला दिले पण त्यांची डाळ जनता शिजू देणार नाही. राजकारणामध्ये काही जणांना पैसा खावून स्व:तची भूक भागवण्याची सवय असते, असेही त्यांनी म्हटले.
























































