पर्यटक बुडू नये यासाठी पनवेलच्या कुंडी धबधब्यात टाकला भराव, पर्यावरणवाद्यांचा संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक पर्यटक नद्यांवर आणि धबधब्यांवर आनंद लुटण्यासाठी जातात. मात्र अनेकदा पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना देखील घडतात. अशा घटना टाळण्यासाठी पनवेल येथील एका धबधब्यावर वन आणि पोलीस अधिकाऱ्यांनी विचित्र इलाज केला आहे.

पनवेल तालुक्यातील प्रसिद्ध कुंडी धबधब्यावर पर्यटकांचा बुडून मृत्यू होऊ नये यासाठी स्थानिक वन व पोलीस अधिकाऱ्यांनी धबधब्याच्या पायथ्याशी दगडांचा भराव टाकून त्याची खोली कमी केली आहे. मात्र अशाप्रकारे कोणतीही परवानगी न घेता नैसर्गिक ठिकाणांवर भराव टाकणे किंवा ब्लास्टिंगचे काम करणे बेकायदेशीर असल्याचा आरोप पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी केला आहे.

वनविभाग, स्थानिक पोलीस, ग्रामपंचायत आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत धबधब्याचा परिसर भरण्यासाठी शनिवार आणि रविवारी उत्खनन यंत्राचा वापर करण्यात आला. वनखात्याच्या जमिनीच्या आत असलेल्या वाजे गावातील कुंडी धबधबा भरण्याचा संयुक्त निर्णय घेण्यात आला होता. दर पावसाळ्यात घटनास्थळी सरासरी चार मृत्यू होतात. येथे बंदी असतानाही अनेकजण पर्यायी मार्गाचा वापर करून धबधब्याच्या परिसरात येतात. असे वन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौडकर म्हणाले की, झोन डीसीपी शिवराज पाटील यांनी त्यांना धबधब्यासंदर्भात प्रतिबंधात्मक पावले उचलण्यास सांगितले होते. त्यानुसार, पावसाळ्यात पर्यटकांचा मृत्यू टाळण्यासाठी धबधब्याचा परिसर भरण्यात आला आहे.

धबधब्याची खोली कमी केल्यामुळे पर्यावरणवादी कार्यकर्ते मात्र संतापले आहेत. बेकायदेशीर भरावामुळे जंगलातील भूदृश्य कायमचे खराब होते. पर्यावरण मंजुरी घेतल्याशिवाय धबधबा भरण्याचा अधिकार वनविभाग किंवा इतर कोणत्याही विभागाला नाही. प्राण्यांसाठी जलस्रोत म्हणून काम करणाऱ्या धबधब्याचे क्षेत्र भरून त्यांनी कायद्याची थट्टा केली आहे, असा आरोप पर्यावरणवाद्यांनी केला आहे.