
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व तत्कालीन ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी क्रिकेट बुकी प्रकरणात खोटय़ा गुह्यात अडकवून साडेतीन कोटी रुपये वसूल केल्याचा आरोप आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकी सोनू जालान याने आज केला. याबाबत ठाणे नगर पोलीस ठाण्यात जालान याने तक्रार दिली केली असून याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
मुंबईच्या मरीन ड्राईव्ह व त्यानंतर ठाण्याच्या कोपरी पोलीस ठाण्यात खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत त्यामुळे वाढ होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकी सोनू जालान आणि केतन तन्ना यांनी ठाणे नगर पोलीस ठाण्यात परमबीर सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी धाव घेतली आहे. बुकी प्रकरणात खोटय़ा गुह्यात अडकवून वरून करोडो रुपये वसूल केल्याचा आरोप जालान याने केला आहे. सिंग यांच्या इशाऱयावरूनच त्यांच्या सहकाऱयांनी आपल्याला धमक्या देऊन आपल्याकडून साडेतीन कोटी रुपये उकळल्याचा गंभीर आरोप सोनू जालान याने केला, तर आपला मित्र केतन तन्ना याच्याकडूनदेखील सवा कोटीची वसुली केल्याचा गौप्यस्फोट केला आहे. काही अधिकाऱयांनी आपल्याला खोटय़ा गुह्यात अडकवून जेलमध्ये टाकल्याचा आरोप त्याने केला आहे. आपल्याला याप्रकरणी न्याय मिळेल अशी अपेक्षा जालान याने व्यक्त केली आहे.





























































