
सामना प्रतिनिधी। परभणी
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे मराठवाड्यातील दुष्काळी भागांचा दौरा करण्यासाठी आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यासाठी बुधवारी परभणी दौऱ्यावर येणार आहेत. अशी माहिती आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिली.
झिरोफाटा येथील एरंडेश्वर शिवारात १६ रोजी दुपारी २ वाजता युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत दुष्काळ निवारण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मराठवाड्यातील एकमेव नियोजित जय भवानी महिला सहकारी सुतगिरणीचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शेळ्या मेंढ्याचे वाटप, महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी शिलाई मशीनचे वाटप, मोफत पोलीस भरती प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आलेल्या १०० युवक युवतींना प्रशिक्षण सामुग्रीचे वाटप आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कृषी विकास परिषदेअंतर्गत स्थापित शेतकऱ्यांच्या उद्योगांना हळद, रेशीम, कडधान्य आदी क्लस्टर विकसित करुन दुष्काळावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमास खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, युवासेना विस्तारक डॉ. गणेशराजे भोसले, अॅड. अमीत गिते, जिल्हाप्रमुख विशाल कदम, माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, महिला संघटक अंबिका डहाळे, उपजिल्हाप्रमुख संजय गाडगे, सदाशिव देशमुख, तालुकाप्रमुख, नंदकुमाचार आवचार, शहरप्रमुख ज्ञानेश्वर पवार, युवासेना शहरप्रमुख बाळराजे तळेकर, विशू डहाळे आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन युवासेना तालुकाप्रमुख संदीप झाडे यांनी केले आहे.
































































