परभणी तहसील कार्यालयाच्या परिसरातच उष्माघाताचा बळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी। परभणी

संपूर्ण परभणी जिल्ह्यात मे महिना लागल्यापासून सूर्य मोठ्या प्रमाणात आग ओकत आहे. यामुळे जिल्ह्यात उष्माघाताचे चार बळी गेले असून परभणी तहसील कार्यालयाच्या परिसरातील ओट्यावर भावी अंशकालीन कर्मचारी असलेले रवींद्र चव्हाण (48) यांचा शुक्रवारी उष्माघाताने मृत्यू झाला आहे. घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा केला असून चव्हाण यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठविण्यात आला आहे.

आज ना उद्या आपणास नियुक्तीचा आदेश मिळेल, या आशेवर रवींद्र चव्हाण तहसील कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भर उन्हामध्ये चकरा मारायचे. अनेकांनी त्यांना तशी आशाही दाखवली होती. कारण अंशकालीनची मागणी मंजूर झाली होती. तेव्हा परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांना त्यांनी आपल्या वेदना बोलून दाखविल्या होत्या. शुक्रावारी तापमानाचा पारा 44.5 अंशावर गेला असताना चव्हाण याची प्राणज्योत मालवली. परभणी जिल्ह्यात विक्रमी तापमानाची नोंद होत आहे. त्यामुळे परभणीकरांवर उष्माघाताची टांगती तलवार कायम आहे. सूर्य आग ओकत असल्याने संपूर्ण मे महिन्यात परभणी जिल्हा होरपळतोय. दररोज तापमान 44 अंशापेक्षा अधिक जात असल्याने उष्णतेच्या लाटा येत आहेत. या कार्यकाळात नागरिकांनी अरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सकाळी 11 ते 4 दरम्यान कामे टाळावीत, असे आवाहन करुनही अनेक नागरिक आपला जीव धोक्यात घालून कामे करताना दिसत आहेत.