
सामना प्रतिनिधी । घोणसी
घोणसी (ता.जळकोट) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा पाचवीचा वर्ग स्टुडंट पोर्टलवर न आल्यामुळे या शाळेतील एक शिक्षक अतिरिक्त झाला आहे. शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे शिक्षक अतिरिक्त झाल्याने पालकांनी एकही मूल शाळेत न पाठवता ठिय्या आंदोलन केले. परिणामी शाळेत आज किलबिलाटा ऐवजी शुकशुकाट दिसून आला.
घोणसी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही केंद्रीय प्राथमिक शाळा होती. येथे सातवीपर्यंत वर्ग होते पण काही कारणास्तव येथील वर्ग कमी होऊन ही शाळा चौथीपर्यंत निम्नस्तरावर आली आहे. कालांतराने होतकरू शिक्षकामुळे शाळेची गुणवत्ता वाढली व शिक्षक आणि पालकांच्या सहकार्याने यावर्षी पाचवीचा वर्ग सुरू करण्यात आला. या वर्गवाढीचा रितसर कार्यालयीन प्रस्ताव पूर्ण करून वर्ग चालू केला गेला. तसा प्रस्ताव पाठवूनही पायाभूतचे गुण भरताना पाचवीचा वर्गच शिक्षण विभागाच्या पोर्टलवरुन गायब झालेला दिसला. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांना पुणे, लातूर, जळकोट येथे शिक्षण विभागात पाठपुरावाही केला. मात्र पोर्टल वर्ग न आल्याने या शाळेतील एक शिक्षक कमी झाल्याच्या कारणास्तव पालकांनी विद्याथ्र्यांसह ठिय्या आंदोलन करत शाळेत मुले न पाठविण्याचा निर्णय घेत शाळेवर पालकांनी बहिष्कार घातला.
या आंदोलनात सरपंच दत्ता घोणसीकर, माजी सरपंच हणमंत बिरादार, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बालाजी गोदाजी, बब्रुवान आंब्रे, सोपान सबुचे, नागनाथ कांबळे आदीजणांसह विद्यार्थी व पालकांनी आंदोलन केले. जोपर्यंत या शाळेतील शिक्षकाचे समायोजन रद्द होणार नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहील, असा इशारा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बालाजी गोदाजी यांनी दिला.































































