
संसदेत बुधवारी काही तरुणांनी घुसखोरी करत स्मोकबॉम्ब फोडले. यामध्ये एक तरुणी व पाच तरुणांचा समावेश होता. यातील पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर एक जण अद्याप फरार आहे.
View this post on Instagram
सागर शर्मा आणि मनोरंजन डी यांनी लोकसभेतील शून्य प्रहरा दरम्यान प्रेक्षकांच्या गॅलरीतून लोकसभेच्या चेंबरमध्ये उडी मारली. तर संसदेच्या बाहेर, नीलम आझाद आणि अमोल शिंदे यांनी पिवळा आणि लाल धूर असलेले स्मोक बॉम्ब वापरले आणि ‘हुकूमशाही’ चालणार नाही, जय भीम, भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. इतर दोन आरोपी म्हणजे ललित झा याने संसदेबाहेर व्हिडीओ शूट केला व फरार झाला. तर विकी शर्मा याच्या घरी इतर आरोपी हल्ल्यापूर्वी राहिले होते.

हे सर्व घुसखोर हे वेगवेगळ्या राज्यातील असून कुणी इंजिनियरींगपर्यंतचे शिक्षण घेतले आहे तर कुणाला पोलीस मध्ये भरती व्हायचे आहे. मैसूरचा असलेला मनोरंजन डी याने कॉम्प्युटर इंजिनियरिंग केलेले आहे. तर सागर शर्मा हा ई रिक्षा चालक चालवायचा.

निलम आझाद ही मूळची हरयाणाची असून तिच्याकडे एम फिल ची पदवी आहे. तिने शिक्षिकेच्या नोकरीसाठी लागणारी महत्त्वाची परिक्षा देखील पास केलेली आहे. निलम तिला चांगली नोकरी मिळत नसल्याने नाराज होती, असे तिच्या आईने सांगितले.

अमोल शिंदे हा मूळचा लातूरमधील झरी गावचा असून त्याने अनेकदा प्रयत्न करूनही तो पोलीस व लष्कर भरतीत यशस्वी होऊ शकला नव्हता.



























































