
पारनेर येथील पिंपळगाव रोठा येथे भुकेने व्याकूळ झालेला एक बिबट्या कुत्र्याचा पाठलाग करत एका घरत शिरल्याची घटना घडली आहे. घरात बिबट्या शिरल्याने एकच खळबळ उडाली होती. पिंपळगाव रोठा येथे गेल्या काही वर्षांपासून बिबटयांचा वावर वाढला असून, आजवर बिबटयांनी भक्ष्यांच्या शोधात अनेकदा पाळीव प्राण्यांना फस्त केले आहेत. शनिवारी सायंकाळी भुकेने व्याकूळ झालेल्या बिबटयाने भक्ष्यासाठी एका पाळीव कुत्रयास लक्ष्य केले.
मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप जगताप यांचा पाळीव कुत्रा घराजवळच फिरत असताना भक्ष्याच्या शोधात असलेला हा बिबट्या त्याच्या मागे लागला. बिबटया कुत्रयाच्या मागे धावू लागताच घाबरलेल्या कुत्र्याने मालकाचे घर गाठून थेट घरातच प्रवेश केला. कुत्रयापाठोपाठ बिबटयाही घरात शिरला. त्यावेळी घरात दिलीप यांची पत्नी आणि काही पाहुणे होते. घरात बिबट्या शिरताच दिलीप यांनी पाहुणे आणि कुटुंबियांना घराबाहेर सुरक्षित काढून बिबट्याला घरात कैद केले. यानंतर त्यांनी याची माहिती वन विभागाला दिली. वन विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर वन विभाच्या पथकाने बिबट्याला गन इंजेक्शनच्या मदतीने बेशुद्ध करून सुरक्षित रित्या बाहेर काढले.
































































