
जुन्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील खेर्डे येथे शुक्रवारी रात्री घडली आहे. याप्रकरणी चारजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
राजेंद्र रामकिसन जेधे (वय 30) असे मृताचे नाव असून, प्रशांत बबन शेळके (वय 23), किशोर भाऊसाहेब शेळके, प्रवीण बबन शेळके (वय 26), बबन जगन्नाथ शेळके (वय 47, सर्व रा. खेर्डे, ता. पाथर्डी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. मृताचे चुलते शेषराव दत्तू जेधे यांनी फिर्याद दिली आहे.
राजेंद्र जेधे व गावातील प्रशांत शेळके यांचा दोन वर्षांपूर्वी गावातील एका लग्नामध्ये नाचण्याच्या कारणावरून वाद झाला होता. त्यावेळी तक्रार न करता आपसात वाद मिटला होता. तेव्हापासून दोघेही एकमेकांसोबत कायम वाद घालत होते. शुक्रवारी रात्री आरोपींनी जेधे याला घराबाहेर बोलावून शिवीगाळ केली. प्रशांत शेळके याने चाकूने राजेंद्रच्या पोटात वार केले. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या राजेंद्रवर पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात प्रथमिक उपचार करून नगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आहे. मात्र, तेथे त्याचा मृत्यू झाला.
शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे, पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे, कॉन्स्टेबल एकनाथ बुधवंत, भगवान सानप, अतुल शेळके, राहुल खेडकर आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण तपास करीत आहेत.

























































