
सामना प्रतिनिधी । कोलकाता
कोलकाता येथील ज्युनियर डॉक्टरला झालेल्या मारहाणीच्या निषेध म्हणून राज्यभरातील डॉक्टरांनी आज काम बंद आंदोलन केले. आंदोलनात 4500 निवासी डॉक्टर तर पाच हजार इंटर्न सहभागी झाले होते. त्यामुळे रुग्णालयातील बाह्य रुग्णसेवा, शस्त्रक्रिया अशी एकूण रुग्णसेवाच कोलमडल्याने डॉक्टर संपावर, रुग्ण वार्यावर अशी स्थिती निर्माण झाली.
कोलकात्यातील घटनेचा निषेध नोंदवत राज्यभरातील रुग्णालयात आज सकाळी 8 ते 5 या केळेत रुग्णसेवा बंद ठेवली. सकाळच्या वेळेत डॉक्टरांनी रुग्णसेवेला प्राधान्य न देता गेटवर जोरदार निदर्शने केली. मुंबईतील पालिकेची तीन प्रमुख रुग्णालये, 19 उपनगरीय रुग्णालये तर राज्य सरकारी रुग्णालयांमधील डॉक्टर या निषेध आंदोलनात सामील झाले होते. 4500 निवासी डॉक्टर तर पाच हजार इंटर्न डॉक्टरांनी आजच्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग घेतल्याचे मध्यवर्ती ‘मार्ड’ व ‘अस्मी’ संघटनांकडून सांगण्यात आले. शुक्रवारच्या रुग्णसेवा बंदची घोषणा गुरुवारी रात्री उशिरा झाल्याने रुग्णालयांतील रुग्णसेवेकर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. निवासी डॉक्टरांची मध्यवर्ती मार्ड, इंटर्न डॉक्टरांची अस्मी संघटना या प्रत्यक्षात आंदोलनात उतरल्या होत्या, तर महाराष्ट्र असोसिएशन ऑफ बॉण्डेड सीनियर रेसिंडट डॉक्टर संघटना, इंडियन मेडिकल असोसिएशनसारख्या संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला होता.
डॉक्टरच म्हणतात, ‘डॉक्टरांना वाचवा!’
केईएम, नायर, शीव तसेच जे. जे. रुग्णालयांच्या प्रवेशद्वाराकर आज निवासी डॉक्टरांनी एकत्र येत निषेध नोंदवला. यावेळी त्यांच्या हातात निषेधाचे फलक होते. तर काहींनी डोक्यात हेल्मेट घालून डॉक्टरांना सुरक्षेची गरज असल्याचे दाखवून दिले. तर काहींनी रक्ताळलेले बॅण्डेज डोक्यावर बांधून हल्ले थांबवण्याचा सल्ला दिला. ‘सेव्ह द सेव्हर’, ‘आम्हाला कुटुंब आहेत, आम्हीही मानक आहोत, आम्ही तुमचे डॉक्टर आहोत’ अशा आशयाचे फलक उभारण्यात आले होते.
रुग्णांचे प्रचंड हाल
निवासी डॉक्टर तसेच इंटर्न डॉक्टरांनी पुकारलेल्या काम बंदमुळे रुग्णसेवेवर प्रचंड परिणाम झाला. सरकारी रुग्णालयांत जर रुग्णांचे असे हाल होत असतील गोरगरीब रुग्णांनी जायचे कुठे, असा सवाल रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत होता. नायर रुग्णालयात एकूण 525 निवासी डॉक्टर हजर होते तर 117 डॉक्टर अनुपस्थित होते. बाह्यरुग्ण कक्षात 907 जणांना तपासण्यात आल्याचे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले. शीव रुग्णालयातील 99 टक्के ओपीडी सुरू असल्याचा दावा अधिष्ठाता डॉ. जोशी यांच्याकडून करण्यात आला. केईएम रुग्णालयात तर आज बाह्यरुग्ण तसेच अपघाती विभागात सेवा मिळणेही रुग्णांना कठीण झाले.



























































