पवनराजे निंबाळकर खून खटल्यात डॉ. पद्मसिंह पाटील यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश

पवनराजे निंबाळकर खून प्रकरणी माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश मुंबई येथील सत्र न्यायालयाने दिले आहेत. 13 ऑक्टोबर रोजी न्यायालयात उपस्थित न राहिल्यास अटक वारंट काढण्यात येईल असेही या आदेशात म्हटले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, 3 जून 2006 रोजी पवनराजे निंबाळकर यांची कळंबोली येथे हत्या झाली होती. सदर प्रकरणी डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या सह इतर 9 जनांवर सीबीआय मार्फत दोषारोप पत्र दाखल झाले आहे. सदर खटला मुंबई येथील सत्र न्यायालयात चालू आहे. सदर प्रकरणातील आरोपी क्र. 4 पारसमल ताराचंद बदाला जैन याने न्यायालयात माफीचा साक्षीदार म्हणुन साक्ष देण्यासाठी अर्ज सादर केला होता. सदरचा अर्ज न्यायालयाने मंजुर केल्यानंतर पारसमल जैन याची मुंबईतील सत्र न्यायालयात साक्ष नोंदवण्यात आली.

6 ऑक्टोबर 2021 रोजी सदर खटल्यामध्ये तारीख दिलेली होती. त्या दिवशी माफीचा साक्षीदार पारसमल जैन यांनी सर्व आरोपीची ओळख न्यायालयास पटवून दिली. परंतु त्यावेळी आरोपी नं. 1 डॉ. पद्मसिंह पाटील हे गैरहजर होते. त्यांच्या वकीलांनी डॉ. पद्मसिंह पाटील आजारी असल्याचे कारण पुढे करत ते खटल्यात हजर राहू शकत नाहीत. त्यामुळे मुदत मागितली. त्यावेळी सदर प्रकरणातील फिर्यादी आनंदीदेवी भुपालसिंह यांनी सदर खटल्यात नेमलेल्या खाजगी वकीलांनी डॉ. पद्मसिंह पाटील हे आजारी नसून ते अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणीकरीता विविध ठिकाणी हजर असल्याचे तसेच विविध कार्यक्रमात हजेरी लावत असल्याचे फेसबुक पोस्टद्वारे न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिले.

सदरचा खटला हा माफीचा साक्षीदार पारसमल जैन यांचेकडून डॉ. पद्मसिंह पाटील यांची ओळख पटविण्याकरीता नेमलेला असताना डॉ. पद्मसिंह पाटील आजारी असल्याचे कारण दाखवून न्यायालयात हजर राहण्याचे टाळत असल्याचे निदर्शनास आले. डॉ. पद्मसिंह पाटील यांची उपस्थिती सदर खटल्यात अनिवार्य आहे. त्यामुळे न्यायालयाने त्यांना 13 ऑक्टोबर 2021 रोजी हजर रहावे अन्यथा अटक वारंट काढण्यात येईल असा आदेश केला.

पवनराजे निंबाळकर खुन खटल्यातील आरोपी पारसमल जैन याने खुनाची सुपारी घेतल्याचा आरोप त्याच्यावर आहे. तोच आरोपी सदर प्रकरणात माफीचा साक्षीदार होवून त्याने सदर प्रकरणात सविस्तरपणे साक्ष नोंदवून आरोपीची ओळख ही न्यायालयास पटवुन दिली आहे

आपली प्रतिक्रिया द्या