अदानीचे वीजबिल हप्त्याने भरण्यासाठी 30 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; व्याजही माफ होणार

मार्चपासून वीज बिल थकीत असलेल्या अदानी इलेक्ट्रिसिटीच्या मुंबई उपनगरातील वीज ग्राहकांना हप्त्याने वीज बिल भरण्यासाठी 30 ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे. ग्राहकाने हप्त्याने वीज बिल भरण्याबाबत नोंदणी केल्यानंतर पुढील तीन महिने तीन समान हप्त्यात बिल भरता येणार आहे. तसेच त्याच्या थकीत बिलावर आतापर्यंत लागलेले व्याज माफ केले जाणार आहे.

लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक चणचण जाणवत असल्याने वीज आयोगाच्या निर्देशानुसार थकीत वीज बिल तीन समान हप्त्यात भरण्याची सुविधा अदानीने जाहीर केली होती. त्याची मुदत सप्टेंबरमध्ये संपली आहे. मात्र आजही गावी गेलेले उपनगरातील अनेक ग्राहक वीज बिल भरू शकलेले नाहीत. त्याची दखल घेत अदानी इलेक्ट्रिसिटीने तीन समान हप्त्यामध्ये बिल भरण्यासाठी नोंदणी करण्याची मुदत 30 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. त्यानुसार हप्त्याने बिल भरणाऱ्या ग्राहकांना थकीत बिलाच्या रकमेवरील व्याजात सवलत मिळणार आहे. त्यानुसार अदानी इलेक्टिसिटीच्या कॉल सेंटरवर किंवा वीज बिल भरणा केंद्रावर जाऊन ग्राहकांना नोंदणी करावी लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या