कोठडी वाढताच संयमाचा बांध फुटला, तीनही डॉक्टर ढसाढसा रडल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

डॉ. पायल तडवी हिच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या तीन डॉक्टरांना आणखी 14 दिवसांची कोठडी होताच त्यांच्या संयमाचा बांध फुटला आणि त्या ढसाढसा रडायला लागल्या. आम्ही काहीही केलेले नाही. त्यामुळे आम्हाला पुन्हा तुरुंगात डांबून ठेवू नका, यातान भोगायला लावू नका अशी विनवणीही या तिघींनी न्यायालयास केली. त्यांची ही केविलवाणी अवस्था पाहिल्यानंतर मग या तिघींच्या जामीन अर्जाची सुनावणी 17 जून रोजी ठेवली. या दिवशी आपण या तिघींच्या जामीन अर्जावरील युक्तिवाद ऐकून घेऊ असेही न्यायाधीश म्हणाले.

पायल तडवी आत्महत्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या डॉ. हेमा अहुजा, डॉ. भक्ती मेहेर आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघी 29 मेपासून तुरुंगात आहेत. न्यायालयीन कोठडीत असलेल्या  या तिघींना आज पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्यांना 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. न्यायाधीशांनी 21 जूनपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश देताच त्या रडायला लागल्या.

आमच्याबाबतीत अन्याय झाला आहे

आम्ही कोणताही गुन्हा केलेला नाही तरीदेखील आमच्याबाबतीत अन्याय झालेला आहे. आम्हाला आता तुरुंगात राहायचे नाही. न्यायाधीशांनी किमान आपल्या जामीन अर्जाची सुनावणी तरी तातडीने घ्यावी, अशी आर्जवंही या तिघींनी केली. त्यामुळे न्यायाधीशांनी त्यांच्या जामीन अर्जाची सुनावणी 17 जून रोजी ठेवली.

सुनावणीच्या व्हिडीओ रेकॉर्डिंगचे आदेश

दरम्यान, सदर प्रकरण रॅगिंग आणि ऍट्रोसिटी निगडित असल्याने या प्रकरणाच्या सुनावणीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात यावे, अशी विनंती डॉ. पायल तडवीच्या कुटुंबीयांनी केली. ही विनंती न्यायाधीशांनी मान्य केली. तसेच न्यायालयाच्या रजिस्ट्रार आणि पोलिसांना व्हिडीओ रेकॉर्डिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.