नायर रॅगिंग; तिघींच्या कोठडीसाठी पोलीस उच्च न्यायालयात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस आता उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. त्यासाठी विधी व न्याय खात्याकडून परवानगी मिळाली आहे. नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवीने आत्महत्या केली होती. या प्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहेर व  डॉ. अंकिता खंडेलवालविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी या तिघींना मुंबई आणि पुण्यातून अटक केली होती. न्यायालयाने या तिघींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीची मुदत संपत असतानाच याचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट-3 कडे सोपवण्यात आला. 31 मे  रोजी गुन्हे शाखेने या तीन डॉक्टरांना सत्र न्यायालयात हजर केले. पायलच्या आत्महत्येपूर्वीची चिठ्ठी हस्तगत करणे आणि त्या डॉक्टरांची समोरासमोर चौकशी करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले होते. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर महानगर दंडाधिकाऱ्यानी तीन डॉक्टरांना न्यायालयीन कोठडी सुनावली. या तिघींच्या पोलीस कोठडीकरिता उच्च न्यायालयात जाण्याबाबत नुकतीच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानी चर्चा केली. विधी खात्याने आज पोलिसांना परवानगी दिली.

जामिनासाठी अर्ज

हेमा अहुजा, भक्ती मेहेर आणि अंकिता खंडेलवाल यांनी आज सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. पायलची जात कोणती हेच आम्हाला ठाऊक नव्हते. त्यामुळे जातीवरून तिला चिडवण्याचा वा छळ करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे या तिघींनी जामीन अर्जात म्हटले आहे. पायलला फक्त कामात सुधारणा कर एवढेच आम्ही सांगत होतो आणि हा छळ होऊ शकत नाही, असेही अर्जात नमूद करण्यात आले आहे.