
रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात नियुक्त करण्यात आलेल्या 74 बीएएमएस डॉक्टरांचा थकलेला चार महिन्यांचा पगार देण्यात आला आहे. सेवेत रुजू झाल्यापासून सलग सहा महिने या 74 डॉक्टरांना पगारच मिळाला नव्हता. त्यांना पगार मिळण्यासाठी जि.प़. चे आरोग्य सभापती महेश म्हाप आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबीता कमलापूरकर यांनी प्रयत्न केले होते.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये डॉक्टरांची कमतरता होती. त्यामुळे शासनाचे बीएएमएस पात्रतेचे कंत्राटी डॉक्टर भरण्याचा निर्णय घेतला होता. सप्टेंबर 2009 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात 74 बीएएमएस डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली. त्यांना 40 हजार रुपये पगारावर प्राथमिक आरोग्य केंद्रात रुजु करण्यात आले होते. कंत्राटी पध्दतीने घेतलेल्या या 74 डॉक्टरांना हजर झाल्यापासून एकाही महिन्याचा पगार मिळाला नव्हता. पगार मिळाला नसला तरी आरोग्य सेवेवर कोणताही परिणाम झाला नव्हता. हे डॉक्टर सेवा बजावत होते. सलग सहा महिने पगार न झाल्यामुळे कंत्राटी डॉक्टर वारंवार पगाराची मागणी करत होते. या डॉक्टरांना पगार मिळावा यासाठी जि.प.चे आरोग्य सभापती महेश म्हाप आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबीता कमलापूरकर यांनी प्रयत्न केले होते. कंत्राटी बीएएमएस डॉक्टरांचे 4 महिन्यांचे पगार झाले असून दोन महिन्यांचे पगार थकले आहेत.






























































