भरवशाच्या म्हशीला टोणगा! Paytm IPO लिस्ट होताच शेअरचा भाव कोसळला

देशातील सर्वात मोठ्या डिजिटल पेमेंट कंपन्यांपैकी एक असलेल्या Paytm ने त्यांचा IPO आणण्याचं जाहीर केलं होतं. या आयपीओचं लिस्टींग 18 नोव्हेंबर 2021 रोजी करण्यात आलं. One97 Communications Ltd नावाखाली या कंपनीच्या शेअरची खरेदीविक्री सुरू करण्यात आली आहे.

या आयपीओबाबत भलतीच उत्सुकता निर्माण करण्यात आली होती. देशातील आजवरचा सर्वात मोठा आयपीओ अशी या IPO ला प्रसिद्धी मिळाली होती. या आयपीओ अंतर्गत शेअर मिळाल्यास जबरदस्त फायदा होईल अशी हवा निर्माण झाली होती. हा आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होताच पेटीएमच्या शेअरचा भाव कोसळायला लागला.

ज्या किंमतीला हा शेअर मिळाला, त्याहीपेक्षा कमी दर सध्या मिळत असल्याने गुंतवणूकदार हबकले आहेत. गुरुवारी पेटीएमचा शेअर 1950 रुपयांवर उघडला होता. शेवटचं वृत्त हाती येईपर्यंत या शेअरचा दर 1654 रुपये झाला होता. 10 नोव्हेंबरला या आयपीओ अंतर्गत पेटेएमचे शेअर विकत घेण्याची मुदत संपली होती. 2150 रुपये प्रति शेअर या दराने हे शेअर गुंतवणूकदारांनी खरेदी केले होते.

पेटीएमच्या आगमनापूर्वी कोल इंडिया आणि रिलायन्स पॉवरचे आयपी हे देशातील सर्वात मोठे आयपीओ होते. कोल इंडियाने आयपीओतून 15 हजार कोटी रुपये गोळा करण्यासाठी तर रिलायन्स पॉवरने 11 हजार कोटी रुपये गोळा करण्यासाठी आयपीओ बाजारात उतरवले होते. पेटीएमने या दोन्ही कंपन्यांवर याबाबतीत मात केली आहे. पेटीएमने आयपीओतून 18300 कोटी रुपये गोळा करण्याचं उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवलं होतं.