गोरेगावमध्ये होणार पालिकेचे बालरोग रुग्णालय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी, मुंबई

गोरेगावमध्ये असलेल्या पालिकेच्या गोकुळधाम प्रसूतिगृहाच्या इमारतीमध्ये लवकरच पालिकेचे पहिलेवहिले बालरोग रुग्णालय सुरू होणार आहे. गोकुळधाम प्रसूतिगृहाच्या पहिल्या, दुसऱया व तिसऱया मजल्यावरील 1292 चौ. मीटर जागेवर 65 खाटांचे बालरोग रुग्णालय खासगी सार्वजनिक सहभागांतर्गत सुरू होणार आहे. नवजात शिशू कक्षासह बालरोग अतिदक्षता सुविधा कक्षही या रुग्णालयात असणार आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरातील नागरिकांची मोठी सोय होणार आहे.

गोरेगावच्या गोकुळधाम प्रसूतिगृहाच्या इमारतीमधील जागेवर पालिकेने हे रुग्णालय सुरू करण्याचे ठरवले आहे. ‘मे. लाइफलाइन मेडिकेअर रुग्णालय प्रा. लि.’ या संस्थेला 15 वर्षांसाठी हे रुग्णालय चालवण्यास देण्यात येणार आहे. प्रतिमहिना 2 लाख 85 हजार 103 रुपये इतक्या भाडय़ाने ही जागा संस्थेला दिली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव नुकताच सुधार समितीमध्ये मंजूर झाला असून लवकरच सभागृहाचीही मंजुरी मिळणार आहे.

या सुविधा मिळणार
30 खाटा सर्वसामान्य बालरोग उपचारांकरिता.
20 खाटा नवजात शिशू कक्ष (एनआयसीयू) सुविधेकरिता.
15 खाटा बालरोग अतिदक्षता सुविधा कक्ष. रुग्णालयाची स्वतःची रुग्णवाहिका सेवा.
आवश्यकतेनुसार बाळाची आई व नातेवाईकांच्या विश्रांतीसाठी व बसण्याची सोय.

सेवासुविधांकरिता आकारण्यात येणारे शुल्क
35 टक्के रुग्णांकरिता मोफत किंवा महापालिकेच्या दरांप्रमाणे.
45 टक्के रुग्णांकरिता शासनमान्य विमा योजनांच्या प्रमाणित दराप्रमाणे.
20 टक्के रुग्णांकरिता शासनमान्य विमा योजनेच्या प्रमाणित दर आकारणीच्या 25 टक्के कमी दरात.

summary – pediatric hospital of bmc in goregaon