
म्हाडाने नागरिकांचे कार्यालयीन व्यवहार अधिक सोपे करण्यासाठी वांद्रे येथील मुख्यालयात नागरिक सेवा केंद्र सुरू केले होते. या केंद्रामार्फत नागरिकांकडून विविध कागदपत्रे, टपाल, अर्ज अथवा इतर आवश्यक कागदपत्रे स्वीकारून संबंधित कार्यालयांकडे पाठविण्याची सुविधा उपलब्ध होती. आता या व्यवस्थेचे अद्ययावतीकरण करून ‘सीएफसी ऍट होम’ ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे. याद्वारे नागरिकांना आता घरबसल्या विविध अर्ज, तक्रारी तसेच इतर आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करून थेट म्हाडाकडे पाठविता येणार आहेत.
म्हाडा मुख्यालयात मुंबई मंडळ, कोकण मंडळ, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ, गिरणी कामगार विभाग, झोपडपट्टी सुधार मंडळ अशी विविध कार्यालये आहेत. विविध कामानिमित्त दिवसाला सुमारे चार ते पाच हजार नागरिक या कार्यालयाला भेट देतात. मात्र तक्रारीचा फॉलोअप घेण्यासाठी नागरिकांना वारंवार म्हाडा मुख्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. आता या कटकटीपासून रहिवाशांची सुटका करण्यासाठी म्हाडाने ही सुविधा सुरू केली आहे.
अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आता ‘नो वेटिंग’
म्हाडातर्फे व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टम हे मोबाईल ऍप उपलब्ध करून देण्यात आले आहे. याद्वारे म्हाडाची कार्यालये व अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे कार्यालयाबाहेरील रांगा तसेच अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेरील प्रतीक्षेचा कालावधी कमी होण्यास मदत होणार आहे. संबंधित अधिकारी बैठकीत व्यस्त किंवा रजेवर असल्यास त्याबाबतची माहिती नागरिकांना मोबाईल ऍपद्वारे प्राप्त होणार आहे.



























































