राजधानीही ‘ठाकरे’च्या स्वागतासाठी सज्ज!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,नवी दिल्ली

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘ठाकरे’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपट येत्या 25 जानेवारीला जगभरात प्रदर्शित होत आहे. दिल्लीकरांमध्येही आणि खास करून प्रसारमाध्यमांमध्ये या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता असून देशाची राजधानी ‘ठाकरे’च्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे.

चित्रपटाचे निर्माते संजय राऊत, शिवसेनाप्रमुखांची व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते नवाजुद्दीन सिद्दिकी आणि अभिनेत्री अमृता राव यांनी आज राजधानीतील वर्दळीच्या कॅनॉट प्लेसमधील कार्निव्हल सिनेमा येथे पत्रकारांशी संवाद साधला. ज्या नेत्याशी लाखो माणसे एका विशिष्ट प्रेमातून व भावनेतून जोडली गेली आहेत अशा एका महान नेत्याची भूमिका वठविणे माझ्यासाठी आव्हानात्मक होते. शिवसेनाप्रमुख साकारणे हे माझ्या करीअरमधील सर्वात मोठे आव्हान होते, असे नवाजुद्दीन सिद्दिकी यांनी सांगितले. तर स्वर्गीय माँसाहेब सौ. मीनाताई  ठाकरे यांची भूमिका साकारणाऱ्या अमृता राव हिनेही माँसाहेबांचा रोल माझ्यासाठी आजवरचा सर्वात वेगळा व महत्त्वाचा असल्याचे नमूद केले. ही भूमिका म्हणजे माझ्या फिल्मी करीअरमधील सर्वोच्च संधी आहे असे मी मानते, असे अमृता राव यावेळी म्हणाली. चित्रपटाचे निर्माते खासदार संजय राऊत यांनी दिल्ली आणि देश-विदेशातही ‘ठाकरे’ सिनेमाला प्रचंड प्रतिसाद मिळेल असा विश्वास यावेळी बोलून दाखवला.

माझ्या आईला खूप आनंद झाला!

‘ठाकरे’ सिनेमात मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारतोय हे समजल्यावर माझ्या आईला खूप आनंद झाला आणि तिच्या आनंदापेक्षा मला काहीही मोठे नाही, अशी भावुक प्रतिक्रियाही अभिनेते नवाजुद्दीन सिद्दिकी यांनी यावेळी व्यक्त केली.