
सरकारने योजनांच्या घोषणा केल्या, त्या फसव्या निघाल्या, कांदा निर्यातबंदी करून शेतकऱ्यांचे कंबर मोडले, पेट्रोलचे दर वाढविले, मग अशा भाजप सरकारला कशाला मतदान करायचे, असा तक्रारींचा पाढाच जनतेने वाचला. नगर तालुक्यातील अनेक गावांमध्ये जनतेने आपल्या भावना व्यक्त केल्या. आमची सरकारने फसवणूक केली आहे, अशा शब्दांत अनेक गावकऱ्यांनी आपल्या भावना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आयोजित केलेल्या ‘होऊ द्या चर्चा’ या कार्यक्रमांतर्गत केली. या अभियानाला शेतकऱ्यांसह जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला.
केंद्र व राज्य सरकारच्या फसव्या आश्वासनांची पोलखोल करण्यासाठी नगर तालुक्यात ‘होऊ द्या चर्चा’ या अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी नगरचे दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, शिवसेना उपनेते साजन पाचपुते, उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, तालुकाप्रमुख राजेंद्र भगत, शरद झोडगे, नगरसेवक योगिराज गाडे, पोपट निमसे, प्रकाश बोरुडे, अमोल कदम, निसारभाई शेख, विक्रम गायकवाड, आदिनाथ शिंदे, अजय बोरुडे, राजू पटेल उपस्थित होते.
आज नगर तालुक्यातील सारोळा बत्ती, भातोडी व सांडवा या गावांमध्ये ‘होऊ द्या चर्चा’ कार्यक्रम घेण्यात आल़ा ग्रामस्थ व युवक या कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने उपस्थित होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी सारोळा या ठिकाणी केंद्र सरकारने 9 वर्षांत कशा पद्धतीने घोषणा केल्या व प्रत्यक्षात शेतकऱ्यांना त्याचा किती लाभ झाला, हे विशद करून सांगितले व त्यातून चर्चेला सुरुवात झाली.
गावातील अनेक मंडळींनी चर्चा घडवून आणल्याबद्दल शिवसेनेचे आभार मानले. या सरकारला सर्वसामान्यांचे काही देणेघेणे नाही, शेतामध्ये नांगरणीसाठी ट्रक्टरला कमी डिझेल लागायचे, मात्र आता डिझेलचे भाव वाढल्यामुळे खिशाला त्याचा बोजा पडला, मोफत गॅस कनेक्शन देऊ म्हणाले, पण काही ठिकाणी दिलेच नाही, कांदा निर्यातीवर बंदी घातली, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बघत नाहीत. दोन रुपये शेतकऱयांना मिळावेत, अशी केंद्र सरकारची भावना नाही. मग त्यांना का मतदान करायचे, असा सवाल गावकऱयांनी उपस्थित केला.
सभेतून खासदार संजय राऊत यांना व्हिडीओ कॉल
नगर तालुक्यामध्ये ‘होऊ द्या चर्चा’ हा कार्यक्रम सुरू असतानाच उपनेते पाचपुते यांनी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना व्हिडीओ कॉल लावला. यावेळी संजय राऊत यांनी जनतेशी संवाद साधून गावकऱ्यांचे प्रश्न समजावून घेतले.






























































