
राज्यातील पेट्रोलच्या दरात प्रति लिटर पाच रुपये आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर तीन रुपये कमी करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळात घेण्यात आला. मध्यरात्रीपासूनच पेट्रोल व डिझेलचे दर कमी होतील. डिझलेच दर कमी केल्यामुळे मालवाहतुकीचे दर कमी होऊन वस्तूंवरील वाढलेले दर कमी होण्यास मदत होईल, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद केला.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, केंद्राने 4 नोव्हेंबर 2021 व 22 मे 2022 रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केली होती. हे दर कमी करताना केंद्र सरकारने देशातील राज्यांनाही कर कमी करण्याची सूचना केली होती. राज्यांनी त्यांचा कर कमी केला तर सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळेल असे केंद्राने म्हटले होते. त्यानंतर काही राज्यांनी केंद्राची सूचना मान्य करून पेट्रोल- डिझेलवरील कर कमी केले होते. राज्याची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन सरकारने पेट्रोल व डिझेलच्या दरात अनुक्रमे पाच व तीन रुपये प्रति लिटर कपात केली आहे. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर सहा हजार कोटी रुपयांचा बोजा पडेल.
…ही तर सरकारची पळवाट
विरोधात असताना भाजपाने पेट्रोल आणि डिझेलवरील कर 50 टक्के कमी करा, अशी मागणी केली होती. मात्र, आता भाजपाचे सरकार आहे. मग त्यांनी कर 50 टक्के कमी का नाही केला, असा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विचारला आहे. ते म्हणाले, जर इंधनावरील कर 50 टक्क्यांनी कमी केला असता तर, डिझेलची किंमत 11 रुपयांनी कमी झाली असती आणि पेट्रोलचे दर 17 ते 18 रुपयांनी कमी झाले असते. मात्र सरकारने असे केले नाही. विरोधी पक्षात असताना मागणी वेगळी करायची आणि निर्णय घेण्याची वेळ आली की पळवाट काढायची, असा खोचक टोला त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला आहे.
























































