
धनेश पाटील,[email protected]
पं. मधुकरबुवा जोशी. शास्त्रीय संगीतातील बुजुर्ग… कंठातून स्वर प्रगटतात त्याप्रमाणे
हातातील व्हायोलीनमधून सूर पाझरतात…
आपल्या तीन पिढय़ांनी जपलेल्या शास्त्रीय संगीताचा वसा कायम ठेवत पं.मधुकर बुवा जोशी यांनी घरंदाज गायकीवर उत्तम प्रभूत्व प्रस्थापित केलं. आपल्या गायकीने आणि व्हायोलिन या वादनाने रसिकमनांवर मोहिनी घालणाऱया याच 82 वर्षीय संस्कारसंपन्न ज्येष्ठ कलाकाराने संगीत विश्वात आपला एक वेगळाच दबदबा निर्माण केला आहे.
गेली तब्बल सात दशकं शास्त्राीय संगीताचा प्रचार आणि प्रसार मोठय़ा ताकदीनं करणाऱया याच संस्कारसंपन्न गायकाचं एक वेगळं हसरं पोट्रेट डोंबिवलीत त्यांच्या राहत्या घरी टिपण्याची संधी मला मिळाली. वयाने ज्येष्ठ असलेल्या या गायकाच्या आवाजात अजूनही तोच खमकेपणा तसंच उत्साह असल्याची अनुभूती मला यावेळी आली. गेल्या अनेक दशकांचा सांगितिक इतिहासाचा साक्षीदार असलेल्या मधुकर बुवांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक यावेळी होती. या फोटोशूटच्या वेळी माझ्यासोबत त्यांची गुणी शिष्या डॉ. वरदा गोडबोले हीदेखील होती. डॉ. वरदा आणि बुवा यांच्यात सांगितीक गप्पा सुरू होत्या. यावेळी त्यांच्या गप्पा सुरेख रंगल्या आणि मला काही कॅण्डीड फोटो टिपता आले. यानंतर बुवांचे काही पोर्ट्रेट मी टिपले. बुवांचा स्वभाव गाण्याच्या बाबतीत सांगायचा झाला तर तसा खमका. मात्र वैयक्तिक आयुष्यात ते अत्यंत मिश्किल स्वभावाचे असल्याचं यावेळी मला जाणवलं. फोटो टिपताना त्यांच्याशी संवाद साधून त्यांना मी बोलतं केलं. यावेळी त्यांनी त्यांच्या आयुष्यातले काही गमतीशीर किस्से सांगितले. मात्र त्यांच्या जीवनप्रवासाबद्दल फार काही सांगितलं नाही. इतिहासात फारसा न रमणारा आणि भविष्यात नवनिर्माण करण्यावर अधिक भर देणारा असा बुवांचा स्वभाव असल्याचा मला यावेळी प्रकर्षाने जाणवलं.
बुवा नेमके घडले कसे, या विषयावर त्यांच्या शिष्यपरिवाराकडून आणि जवळच्या व्यक्तींकडून माहिती मिळाली. त्यांच्या इतिहासात डोकावल्यानंतर त्यांचा हा सांगितीक प्रवास थक्क करणारा आहे. संगीताच्या सूरमयी वातावरणातच पं. मधुकरबुवा हे लहानाचे मोठे झाले. घरी तीन पिढय़ा संगीतालाच वाहून घेतलेल्या पं. मधुकर बुवांवर संगीताचे संस्कार हे आपसुकचं झाले. पं. मधुकर बुवांचे वडील पं. गजाननराव जोशी तर आजोबा पं. अनंत जोशी हे ख्यातनाम शास्त्रीय गायक. पं. गजाननरावांनी तीन घराण्याचं शास्त्राrय संगीत शिकलेलं तर गायकीसोबतच त्यांना व्हायोलिन या वाद्याचीही विशेष आवड होती. वडिलांचे हेच गुण पं. मधुकर बुवा यांच्यात उतरले अन् त्यांनी शास्त्राrय गायन आणि व्हायोलिन या दोन्हीचा दांडगा अभ्यास केला.
पं. गजाननराव हे आकाशवाणीवर संगीत मार्गदर्शक म्हणून कार्यरत होते. सुरुवातीला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रात असलेल्या पं. गजाननरावांनी मुंबईनंतर इंदौर तर त्यानंतर लखनौ अशी स्वतःची बदली करून घेतली. यानंतर ते पुन्हा मुंबई केंद्रात दाखल झाले आणि त्यावेळी त्यांनी मुंबईऐवजी डोंबिवलीत स्थायिक होण्यास पसंदी दिली. मूळचे सातारा जिह्यातले पं. मधुकर बुवा हे 1958 साली वडिलांसोबत डोंबिवलीत स्थायिक झाले.
संगीताचं बाळकडूच पं. मधुकर बुवांना लाभलं ते त्यांच्या घरातील मातब्बर मंडळींमुळे. संगीताचं संपूर्ण शिक्षण वडिलांकडून तसंच आजोबांकडून त्यांना मिळालं. अन् ते त्यांच्या तालमीत चांगलेच तयार झाले. औंध संस्थानच्या कोल्हापूर आणि पुण्याच्या शाळेत त्यांचं शालेय शिक्षण पूर्ण झालं. घरी संगीताचंच वातावरण असल्याने शालेय शिक्षणापेक्षा संगीताच्या शिक्षणाकडेच त्यांच्या पालकांनी त्यांना लक्ष देण्याची सूचना वजा आदेशच दिल्याने पुढे पुस्तकी शिक्षणाऐवजी ते संगीताच्या शिक्षणातच ते अधिक रमले. पं. मधुकर बुवांनी ग्वाल्हेर घराण्याबरोबरच आग्रा आणि जयपूर घराण्यातल्या गायकीवर चांगलीच पकड मिळवली आणि शास्त्रीय संगीताच्या विश्वात आपला एक वेगळाच ठसा उमटवला. शास्त्राrय संगीताचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने पं. मधुकर बुवांनी अनेक कार्यक्रम देशभरात केले. तसचं याच संगीताचा वसा पुढे कायम राहावा याकरिता त्यांनी अनेक शिष्यही घडवले. संगीताचार्य वरदा धारप-गोडबोले, नुपूर काशिद ही त्यातील काही नावाजलेली नावं.
शास्त्रीय गायानाच्या अभ्यासाच्या जोडीने त्यांनी व्हायोलिन या वाद्याचा अभ्यास करण्यासही सुरुवात केली. वडील उत्तम व्हायोलिन वादक असल्याने हिंदुस्थानी व्हायोलिनचे धडे त्यांना त्यांच्याकडूनच मिळाले होते. याच्या जोडीने त्यांनी पाश्चात्य व्हायोलिन वादनाचे धडे वांद्रे येथील गुरू फर्नांडिस यांच्याकडे गिरवले अन् अल्पावधीतच त्यांनी या वाडय़ावरही चांगलीच पकड मिळवली. पुढे लता मंगेशकर, आशा मंगेशकर, श्रीरामचंद्र, येसूदास अशा दिग्गजांना पं. मधुकर बुवांनी व्हायोलीनची साथसंगत केली होती. याखेरीज आकाशवाणीला प्रत्येक महिन्याला त्यांच्या व्हायोलिन वादनाचे कार्यक्रम नियमितपणे होत असत. 1978 ते 1990 या कालावधीत त्यांनी आकाशवाणीला व्हायोलिन वादक म्हणून कामही पाहिलं आणि त्यांच्या वादनाचे कार्यक्रम देशभरातल्या आकाशवाणीच्या विविध केंद्रातही आयोजित करण्यात आले होते. आजवर त्यांनी तब्बल 150 हून अधिक संगीतनाटकांसाठी व्हायोलिन वादन केलं आहे, हे विशेष.























































